विरार नगरपरिषदेच्या तत्कालीन नगराध्यक्षांची खळबळजनक माहिती

वसई-विरार शहरांची पिण्याच्या पाण्याची चिंता पूर्णपणे मिटली नसताना विरारमधील पापडखिंड धरण बंद करण्याचे जोरदार प्रयत्न राजकीय पातळीवर सुरू आहेत. प्रदूषण, धरणाच्या देखभाल दुरुस्तीचा वाढता खर्च अशी कारणे देत पालिकेने धरण बंद करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र हे धरण नष्ट करण्याचा कट १३ वर्षांपूर्वीच शिजला होता हे स्पष्ट झाले आहे. सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या २००६ च्या निवडणूक जाहीरनाम्यातच धरण बंद करून त्या जागी वॉटर पार्क उभारण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तत्कालीन विरार नगर परिषदेच्या नगराध्यक्षांनीच ही बाब समोर आणली आहे.

शहरात सूर्या पाणी प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक-२ मधून अतिरिक्त १०० दशलक्ष लिटर्स पाणी आल्याने आता पाण्याची गरज उरलेली नाही. पापडखिंड धरणात होणाऱ्या छटपूजेमुळे पाणी दूषित झाले आहे, तसेच या धरणाच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचा खर्च  परवडत नसल्याने हे धरण बंद केले जात असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे.

धरण बंद करण्याचा निर्णय सत्ताघारी बहुजन विकास आघाडीने २००६ साली घेतला होता, असे आता समोर आले आहे. विरार नगर परिषदेचे तत्कालीन नगराध्यक्ष मुकेश सावे यांनी पापडखिंड धरण बंद करण्याचा निर्णय २००६च्या पक्षाच्या जाहीरनाम्यातच होता असे समाजमाध्यमावर जाहीर केले आहे. जाहीरनाम्यात धरण बंद करून मनोरंजनासाठी धरण विकसित केले जाईल, असे आश्वासन या जाहीरनाम्यात होते. या निवडणुकीत बविआच्या सर्व जागा निवडून आल्या होत्या, असेही त्यांनी सांगितले. २००६ साली वसई विरार शहरात पाण्याचा प्रचंड तुटवडा होता. अशावेळी सत्ताधारी सुस्थितीतील धरण कसे काय बंद करू शकते, असा सवाल उपस्थित होत आहे.

काँग्रेसचा आयुक्तांना घेराव

काँग्रेसच्या वतीने मंगळवारी पापडखिंड धरण वाचविण्यासाठी आयुक्तांची भेट घेऊन जाब विचारण्यात आला. पापडखिंड धरण वसईच्या जलक्रांतीचे तेजोमय प्रतीक आहे. धरण बंद करण्याचा निर्णय दुर्दैवी असल्याचे काँग्रेसचे नीलेश पेंढारी यांनी म्हटले आहे.