लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : डोंबिवली जवळील ९० फुटी रस्त्यावरील कांचनगाव येथे घराचे हप्ते थकविणाऱ्या कर्जदारांना नोटीस देण्यासाठी गेलेल्या बजाज फायनान्स कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना कर्जदारासह त्याच्या इतर तीन साथीदारांनी शुक्रवारी कर्जदाराच्या घरासमोर बेदम मारहाण केली. या मारहाणीत महिला अधिकाऱ्यांचे कपडे फाडण्यात आले.

शितल सुनील टाक असे बजाज फायनान्सच्या तक्रारदार महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. त्या आपल्या एक सहकाऱ्यासोबत शुक्रवारी बजाज फायनान्सकडून कर्ज घेतलेल्या प्रियंका रावराणे यांना थकीत कर्जाची नोटीस देण्यासाठी गेल्या होत्या. प्रियंका रावराणे या ठाकुर्ली जवळील ९० फुटी रस्त्यावरील कांचनगाव मधील मध्यमवर्गियांची वस्ती असलेल्या मंगेशी डेझल्स सोसायटीत राहतात.

आणखी वाचा-ठाणे : क्राइम ब्रांचचे अधिकारी असल्याचे सांगून वृद्धाची फसवणूक

सुरज गुलाबचंद शिर्के (२९, रा. समर्थ कॉम्पलेक्स, आयरेगाव, डोंबिवली), संदेश सयाजी रावराणे (२६, लक्ष्मी केणे इमारत, आयरे रोड, डोंबिवली) आणि इतर अनोळखी दोन इसम अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी तक्रारदार शितल टाक यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्याला बेदम मारहाण केली आहे. टिळकनगर पोलीस ठाण्यात शितल टाक यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले, कांचनगावमध्ये मंगेशी डेझल्स सोसायटीत राहणाऱ्या प्रियंका रावराणे यांनी बजाज फायनान्स या वित्तीय संस्थेतून कर्ज घेतले आहे. त्यांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. त्यामुळे बजाज फायनान्सतर्फे प्रियंका यांना कर्ज भरण्यासंदर्भातची नोटीस देण्यासाठी तक्रारदार शितल आणि सहकारी शुक्रवारी कांचनगावमधील घरी दुपारी तीन वाजता गेले होते. त्यावेळी चारही आरोपी तेथे होते. शितल आणि सहकारी रावराणे यांना नोटीस देण्याची कार्यवाही करत होत्या. त्यावेळी आरोपींनी त्यांच्याबरोबर वाद घातला.

आणखी वाचा-मनसेची डोंबिवली, बदलापूरमधील दहीहंडी रद्द, आमदार प्रमोद पाटील यांची माहिती

शितल यांच्या सहकाऱ्याला आरोपींना हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. आम्ही फक्त नोटीस देण्यासाठी आलो आहोत. एवढे सांगुनही आरोपी ऐकण्यास तयार नव्हते. शितल यांना अश्लिल भाषेत शिवागाळ करण्यात आली. तसेच त्यांच्या हातामधील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. या झटापटीच्या वेळी शितल यांच्या कुर्त्याचा बटनाजवळील भाग आरोपीने फाडून लज्जास्पद कृती केली.

अचानक घडलेल्या या प्रकाराने तक्रारदार शितल यांच्यासह सहकारी हादरले. त्यांनी तेथून काढता पाय घेऊन टिळकनगर पोलीस ठाणे गाठले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.