scorecardresearch

कल्याणमध्ये गुंतवणूकदारांची बालाजी ज्वेलर्सकडून फसवणूक ; दुकान बंद करुन मालक पसार

काटेमानिवली मिलिंदनगर मधील रिक्षा चालक संदीप गांगुर्डे (३४) या गुंतवणूकदाराने तक्रारीसाठी पुढाकार घेतला आहे.

कल्याणमध्ये गुंतवणूकदारांची बालाजी ज्वेलर्सकडून फसवणूक ; दुकान बंद करुन मालक पसार
(संग्रहित छायाचित्र) फोटो-लोकसत्ता

कल्याण- कल्याण पूर्व काटेमानिवली येथील एफ केबिन रस्त्यावरील बालाजी ज्वेलर्स या दुकानाच्या मालकाने परिसरातील १० रहिवाशांचे दुकानात गहाण ठेवलेले एकूण ६६५ ग्रॅम वजनाचे २६ लाख ६० हजार रुपये किमतीचे सोने घेऊन पसार झाला आहे. रहिवाशांची भिशीची १४ हजाराची रक्कम मालकाने स्वताच्या फायद्यासाठी वापरुन गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर गुंतवणूकदारांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. रिक्षा चालक, गृहिणी, घर सेविका, कष्टकरी अशा सामान्य घरातील गुंतवणूकदार आहेत. काटेमानिवली मिलिंदनगर मधील रिक्षा चालक संदीप गांगुर्डे (३४) या गुंतवणूकदाराने तक्रारीसाठी पुढाकार घेतला आहे.

हेही वाचा >>> कल्याण : दिवा बेतवडे गावातील मयत मासळी विक्रेतीच्या मुलाला चार लाखाची भरपाई

पोलिसांनी सांगितले, काटेमानिवली भागात एफ केबिन रस्त्यावर बालाजी ज्वेलर्सचे मालक रामसागर रामजित सोनी २५ वर्षापासून दागिने घडण, विक्रीचा व्यवसाय करतात. कल्याण पूर्व भागातील नागरिकांचा त्यांनी विश्वास संपादन केल्याने बहुतांशी रहिवाशी त्यांच्याकडून सोन्याच्या दागिन्याची घडण, दागिने गहाण ठेऊन पैसे घेणे व्यवहार करत होते. सोनी यांच्या भिशी योजनेत परिसरातील रहिवासी सहभागी होते. रिक्षा चालक संदीप गांगुर्डे यांनी करोना काळात सर्व व्यवहार ठप्प असल्याने घरगाडा चालविण्यासाठी घरातील ६० ग्रॅम सोन्याचे दोन लाख ४० हजार रुपयांचे दागिने बालाजी ज्वेलर्समध्ये गहाण ठेवले होते. दोन वर्ष सोनी यांच्याकडे गहाण ठेवलेले सोने सोडवून घ्यावे म्हणून गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गांगुर्डे बालाजी ज्वेलर्स दुकानात आले. त्यांना दुकान बंद दिसले. त्यांनी बाजुला चौकशी केली. तेव्हा त्यांना सोनी यांचे वडिल आजारी असल्याने ते दुकान बंद करुन घरी आहेत असे सांगण्यात आले.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील आयरे गाव पालिका शाळेची दुरवस्था; विद्यार्थी, शिक्षक धोक्याच्या छताखाली

पु्न्हा गांगुर्डे महिन्यानंतर दुकानात आले. तेव्हाही दुकान बंद होते. दुकान मालक गेले कोठे असा विचार करत असताना एक दिवस नऊ रहिवासी बालाजी दुकानाच्या बाजुला सोनी यांच्याविषयी चर्चा करत उभे होते. त्यावेळी त्यांना बालाजी ज्वेलर्सचे मालक दुकान बंद करुन पसार झाले आहेत असे कळले. दुकान मालक कल्याण पश्चिमेतील तुलसी दर्शन सोसायटी, गंधारनगर, खडकपाडा येथे राहतात. समजल्यावर १० गुंतवणूकदार त्यांच्या घरी गेले. तेथे दुकान मालकाचे वडिल रामजित तेथे होते. त्यांनी मुलगा रामसागर गावी गेला आहे असे सांगून दरवाजा बंद केला. रामजित यांनी रहिवाशांबरोबर अधिक बोलणे टाळले. ते रहिवाशांच्या कोणत्याच प्रश्नाला उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यामुळे बालाजी ज्वेलर्सचे मालक रामसागर सोनी यांनी आपल्या गुंतवणूक रकमेचा अपहार करुन ती स्वताच्या फायद्याकरित वापरुन आपली फसवणूक केली आहे. म्हणून १० गुंतवणूकदारांनी बालाजी ज्वेलर्सच्या मालका विरुध्द कोळसेवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार केली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 15:33 IST