scorecardresearch

दिव्यात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपत वादाची ठिणगी; भाजपने केले कचराभुमी हटविण्यासाठी आंदोलन

महापालिका निवडणुकीत आठपेक्षा अधिक प्रभाग असलेल्या दिवा परिसरातील कचराभूमीचा मुद्दा अडचणीचा ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन तत्कालीन सत्ताधारी शिवसेनेने प्रशासनाच्या मदतीने दिवा कचराभूमी बंद करण्यासाठी पावले उचलून तशी घोषणा केली होती.

दिव्यात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपत वादाची ठिणगी; भाजपने केले कचराभुमी हटविण्यासाठी आंदोलन
दिव्यात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपत वादाची ठिणगी; भाजपने केले कचराभुमी हटविण्यासाठी आंदोलन

महापालिका निवडणुकीत आठपेक्षा अधिक प्रभाग असलेल्या दिवा परिसरातील कचराभूमीचा मुद्दा अडचणीचा ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन तत्कालीन सत्ताधारी शिवसेनेने प्रशासनाच्या मदतीने दिवा कचराभूमी बंद करण्यासाठी पावले उचलून तशी घोषणा केली होती. परंतु वर्षभराचा काळ लोटला तरी भंडार्लीचा कचरा प्रकल्प अद्याप कार्यन्वित झालेला नसल्याने दिव्यातील कचराभुमीची समस्या अद्यापही कायम आहे. याच मुद्द्यावरून भाजपने सोमवारी आंदोलन करत दिवा कचराभुमी बंद करण्याची मागणी केली असून त्याचबरोबर ही मागणी मान्य झाली नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनानंतर राज्यात एकत्रित सत्तेवर असलेल्या बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर टिका केल्याने त्यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे चित्र आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांची शिवसेनेसोबत युती करणार नसल्याचे म्हटले आहे. तर, बाळासाहेबांची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र सावध प्रतिक्रीया दिली आहे.

हेही वाचा >>>ठाणे: फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची १०० टक्के रक्कम परत मिळणार; पोलिसांनी केलेल्या तपासाचे सर्वत्र कौतुक

दिव्यातील कचराभुमीच्या समस्यमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यांच्याकडून कचराभुमी बंद करण्याची मागणी होत आहे. दिवा परिसर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या भागातील आठ प्रभागातून शिवसेनेचे नगरसेवक निवडुण आले होते. आगामी निवडणुकीत कचराभुमीचा मुद्दा शिवसेनेसाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर पालिकेत सत्तेवर असताना शिवसेनेने प्रशासनाच्या मदतीने कचराभुमी बंद करण्यासाठी पाऊले उचलली. त्याचाच एक भाग म्हणून महापालिका क्षेत्राबाहेर म्हणजेच भंडार्ली येथे तात्पुरती कचराभूमी उभारण्यासाठी पालिकेने जागा भाड्याने घेतली आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी काही स्थानिकांनी सुरुवातीला विरोध केला होता. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे पालकमत्री होते. त्यावेळेस त्यांनी घेतलेल्या बैठकीनंतर स्थानिकांचा विरोध मावळला होता. त्यानंतर पालिकेने याठिकाणी कचरा विल्हेवाट यंत्रणा उभारणीबरोबरच रस्ता, शेड तसेच इतर आवश्यक कामे पुर्ण केली होती.

हेही वाचा >>>ठाणे: येऊरच्या जंगलातील धाब्यांवर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; १२ धाबे मालक अटकेत

शिवसेनेतील फुटीनंतर दिव्यातील सर्वच म्हणजेच आठही नगरसेवक बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल झाले आहे. या नगरसेवकांना कचराभुमीच्या मुद्द्यावरून कोंडीत पकडण्याचे काम भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. राज्यातील सत्ताबदलानंतर दोघांचाही विरोध मावळेल आणि दोघेजण युतीमध्ये पालिकेच्या निवडणुका लढतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दिवा कचराभुमीच्या मुद्द्यावरून आंदोलन करत बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची पुन्हा कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. तसेच दिव्यात भाजपची नगरसेविका असताना कचराभुमी उभारण्यात आली असून त्याचबरोबर भंडार्ली कचराप्रकल्पाच्या प्रस्तावास भाजपनेच विरोध केल्याचा आरोप बाळासाहेबांच्या शिवसेनेक़डून करण्यात आला आहे तर, कचराभुमीच्या प्रश्नावर लढत राहणार असल्याचे सांगत दिव्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेत युती करणार नसल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. यामुळे या दोन्ही मित्र पक्षात ठिणगी पडल्याचे चित्र आहे.
निवडणुका जवळ आल्या की दिव्याला दिव्यातील कचराभुमी बंद करण्याचे खोटे आश्वासन देण्यात येते. ऑक्टोबर महिन्यात कचराभुमी बंद होणार होती. पण, डिसेंबर महिना संपत आला तरी कचराभुमी बंद झालेली नाही. नागरिकांच्या प्रश्नासाठी आम्ही लढत असून दिवा कचराभुमी बंदहोईपर्यंत आमचा लढा सुरु राहणार आहे. तसेच ठाणे महापालिका निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत ठाणे शहरात युती झाली तरी दिव्यात आम्ही युती करणार नसून आम्ही स्वबळावरच लढणार आहोत.

-रोहिदास मुंडे ,भाजप, दिवा शहराध्यक्ष

हेही वाचा >>>डोंबिवलीत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तोतया अधिकाऱ्यांनी उद्योजकांकडून उकळली खंडणी; एकाला अटक

दिव्यात भाजपची नगरसेविका होती, त्यावेळी येथे कचरा टाकण्यास सुरुवात झाली. त्याचबरोबर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत भंडार्ली कचराप्रकल्पाच्या प्रस्तावास राष्ट्रवादीबरोबरच भाजपनेच विरोध केला होता. तसेच त्यांनी भंडार्ली कचराप्रकल्पासाठी जागा देऊ नये म्हणून स्थानिकांना भडकविण्याचे कामही केले. भंडार्ली प्रकल्प कार्यन्वित करण्यासाठी निविदा काढण्यात आली असून त्यामुळेच त्याचे श्रेय घेण्यासाठी भाजपने आंदोलनाचे नाटक केले आहे. युती करण्याची की नाही याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवरील नेते घेतील. त्यावर मी भाष्य करू शकत नाही.

-रमाकांत मढवी, माजी नगरसेवक, बाळासाहेबांची शिवसेना</p>

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-12-2022 at 17:27 IST

संबंधित बातम्या