ठाणे : जिल्ह्य़ातील धबधबे, तलाव आणि धरणांच्या परिसरातील पावसाळी पर्यटनस्थळांवर पर्यटकांना येण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. पर्यटकांची गर्दी होऊन करोनाचा संसर्ग वाढू नये तसेच याठिकाणी अपघातात जिवीतहानी होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. पुढील आदेशरयत ही बंदी कायम राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

नैसर्गिक सौंदर्याने संपन्न असलेल्या ठाणे जिल्ह्य़ामध्ये पावसाळाच्या कालावधीत मोठय़ा संख्येने पर्यटक धबधबे, तलाव तसेच धरणांच्या ठिकाणी पर्यटनासाठी येतात. या पर्यटनस्थळांवर शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी होते. या पर्यटनस्थळांजवळील धबधबे किंवा नद्यांमध्ये बुडून मृत्यू होण्याच्या घटना गेल्या काही वर्षांपासून सातत्याने समोर येत आहेत. शिवाय पर्यटनस्थळांवर सामाजिक अंतर राखणे शक्य नसून गर्दीमुळे करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य अपघात आणि करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी पर्यटनस्थळांच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

बंदी कशावर?

’ या आदेशाद्वारे पर्यटनस्थळांवर पर्यटकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्ह्य़ातील धबधबे, तलाव आणि धरणांच्या सभोवतालच्या १ किलोमीटर परिसरात पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे, त्या पाण्यामध्ये पोहणे, धबधब्यावर जाणे आणि पाण्याच्या प्रवाहाखाली बसण्यास बंदी घालण्यात आली आहे.

’ तसेच पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे या ठिकाणी सेल्फी काढण्यास आणि कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

’ पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास, मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करण्यास, मद्य बाळगण्यास, मद्य वाहतूक करण्यास आणि अनाधिकृतरित्या मद्य विक्री करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

’ त्याचबरोबर वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे, बेदरकारपणे वाहन चालवून ओव्हरटेक करणे, सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या तसेच प्लास्टिकच्या बाटल्यांसह थर्माकॉलचे आणि प्लास्टिकचे साहित्य उघडय़ावर फेकण्यासही बंदी घातली आहे.

’ सार्वजनिक ठिकाणी मोठय़ा आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, महिलांची छेडछाड करणे, तसेच पर्यटन स्थळांवर ध्वनी, वायू आणि जल प्रदुषण होईल अशी कोणतीही कृती करण्यासही बंदी आहे.

बंदीची ठिकाणे : येऊर परिसरात असणारे धबधबे, जिल्ह्य़ातील सर्व तलाव, कळवा-मुंब्रा रेतीबंदर, सिद्धगड, डोंगरनाव्हे, सोनाळे गणपती लेणी, हरिश्चंद्रगड, बारवी धरण परिसर, भातसा धरण परिसर, कुंडन, दहीगाव, माहुली किल्ल्याचा पायथा, मुंब्रा बायपास येथील सर्व धबधबे, गायमुख, रेतीबंदर, पडाळे डॅम, माळशेत घाटातील सर्व धबधबे, पळु चेरवली, अशोक धबधबा, खरोड, आजा पर्वत (डोळखांब), सापगांव नदी किनारा, कळंबे नदी किनारा, घोडबंदर रेतीबंदर, उत्तन सागरी किनारा खोपवली, गोरखगड, सिंगापूर नानेघाट, धसई डॅम, आंबेटेबे, मुरबाड आणि कसारा येथील सर्व धबधबे, कांबा पावशेपाडा, खडवली नदी परिसर, टिटवाळा नदी परिसर, गणेश घाट चौपाटी, भिवंडी नदीनाका, गणेशपूरी नदी परिसर, कोंडेश्वर, धामणवाडी, तारवाडी, भोज, वऱ्हाडे, दहिवली, मळीचीवाडी या ठिकाणी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.