ठाणे : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा थेट फटका महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसू लागला आहे. जेएनपीए बंदरातून इराणकडे निर्यात करण्यात आलेले सुमारे ८०० ते १ हजार केळीचे कंटेनर तेथेच अडकून पडले आहेत. याशिवाय, परिस्थितीचा फायदा घेत शिपिंग कंपन्यांनी भाड्यात तब्बल पाच ते सहापट वाढ केल्याने निर्यातदार आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. केळी हा नाशवंत माल असल्याने खराब होण्याचा धोका वाढला असून शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे.

देशातील केळी उत्पादनात महाराष्ट्र राज्य अग्रगण्य मानले जाते. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक हे जिल्हे केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. यामध्ये जळगाव जिल्ह्याला ‘केळीचे राजधानी’ म्हणून ओळखले जाते. याशिवाय छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्येही केळीचे पीक घेतले जाते. महाराष्ट्रात उत्पादित होणारी केळी देशांतर्गत बाजारपेठेसोबतच परदेशातही मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. विशेषतः आखाती देशांमध्ये या केळीची मोठी मागणी असून इराण, युनायटेड अरब अमिरात (UAE), सौदी अरेबिया, ओमान, कतार आणि कुवैत या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. याशिवाय रशिया, नेपाळ, बांगलादेश आणि मालदीव यांसारख्या देशांमध्येही महाराष्ट्रातील केळी पाठवली जाते. ही निर्यात प्रामुख्याने नवी मुंबईतील जेएनपीए बंदरातून केली जाते.

युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात गल्फ देशांकडे जाणारे १२०० ते १५०० कंटेनर जेएनपीए बंदरात अडकले होते. सुमारे १५ दिवसांनी यातील काही कंटेनर इराणकडे पाठवण्यात आले. तर, काही स्थानिक बाजारात विक्रीसाठी वळवण्यात आले. इराणमध्ये कंटेनर पोहोचल्यानंतर शिपिंग कंपन्यांनी युद्धाचा आधार घेत भाड्यात मोठी वाढ केली. युद्धा पूर्वी २ ते ३ लाख रुपये पर्यंत असलेले भाडे दर थेट १५ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे. या वाढलेल्या खर्चामुळे निर्यातदार आणि शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

कंटेनर अडकून राहिल्याने केळी खराब

इराणमध्ये पोहोचलेले जवळपास १ हजार कंटेनर शिपिंग कंपन्यांनी अडवून ठेवल्याने केळी खराब होऊ लागली आहेत. एकीकडे वाढलेले भाडेदर आणि दुसरीकडे खराब होणारा माल, यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सोलापूरमधील ५० ते ६० शेतकऱ्यांनी शिपिंग कंपन्यांमध्ये धडक देत जाब विचारला. मात्र, काही कंपन्यांनी पोलिसांना बोलावून शेतकऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

हिंगोलीतील शेतकरी चिंतेत

युद्धाचा परिणाम हिंगोली जिल्ह्यातील केळी निर्यातीवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. कळमनुरी आणि वसमत तालुक्यातील केळीची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. व्यापारी खरेदीसाठी पुढे येत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. निर्यात बंद झाल्यामुळे केळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या केळीला फक्त ३०० ते ४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघत नाही.

जेव्हा पासून युद्ध सुरु झाले आहे तेव्हा पासून मालाचे कंटेनर हे अडकून आहेत. युद्धापूर्वी ८ ते १० दिवसात माल दुबईला पोहोचत होता परंतू, आता २० दिवसाहून अधिक काळ माल पोहोचण्यास लागत आहे. या कालावधीत अनेकदा माल खराब होत आहे. माल खराब होत असल्यामुळे आम्हाला त्या माला योग्य तो भाव मिळत नाही. त्यात, युद्धामुळे विमा सुविधा देखील बंद ठेवली आहे. याचा आणखी फटका आम्हाला बसत आहे. पर्यायी म्हणून आम्ही विमानाने माल पोहोचविण्यास प्राधान्य देण्याचे ठरविले परंतू, हवाई कंपन्यांनी देखील भाडेदरात मोठी वाढ केली आहे. पूर्वी १ किलो मागे १०० रुपये आकारले जात होते आता थेट ३०० रुपये आकारले जात आहे. यासर्व प्रकारामुळे निर्यातील ब्रेक लागला असून उत्पादक शेतकऱ्यांचेही यात मोठे नुकसान होत आहे. – कार्तिक कोनार, निर्यातदार