सतत किरकोळ कारणांवरुन तडीपारीच्या नोटिसा, पोलीस ठाण्यात फेऱ्या मारुन जबाब देणे, या कारणांवरुन मनस्ताप देणे असा त्रास सतत देण्यापेक्षा एकदाच तडीपारीचा काय तो निर्णय घेऊन टाका, असे आवाहन शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) कल्याण जिल्हाप्रमुख विजय उर्फ बंड्या साळवी यांनी पोलिसांना केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>‘पठाण’ चित्रपटाचा शेवटचा खेळ जीवावर बेतला; मीरा रोड परिसरात भरधाव वेगाने जाणार्‍या दोन दुचाकीस्वार तरुणांचा मृत्यू

गेल्या वर्षापासून बंड्या साळवी यांना राजकीय गुन्ह्यांवरुन नोटिसा पाठवून पोलीस तडीपारीची कार्यवाही करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शिवसेनेत असताना दुर्गाडी किल्लावरील आंदोलन, महागाई अशा अनेक कारणांवरुन शिवसेनेतर्फे वेळोवेळी तत्कालीन शिवसेना नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाप्रमुख बंड्या साळवी यांनी शिवसैनिकांच्या उपस्थितीत आंदोलन केली आहेत. शिवसेनेच्या फुटीनंतर कल्याणमधील अनेक जुने शिवसैनिक ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात दाखल होण्यास तयार नाहीत. त्यामुळे विजय साळवी यांना हा त्रास दिला जात आहे, असे कल्याण मधील ज्येष्ठ शिवसैनिकांनी सांगितले.

हेही वाचा >>>आनंद दिघेंच्या जयंतीदिनी राजन विचारेंनी जारी केला खास व्हिडीओ; म्हणाले, “…हीच दिघे साहेबांना गुरुदक्षिणा”

गेल्या वर्षी बंड्या साळवी यांना तडीपारीची नोटीस आल्यानंतर अनेक ज्येष्ठ शिवसैनिकांनी याविषयी नाराजी व्यक्त केली होती. शिवसैनिकांनी निषेध आंदोलन केली होती. त्यानंतर हे प्रकरण थंडावले होते. काही दिवसापूर्वी बंड्या साळवी यांना पोलिसांनी पुन्हा तडीपारीची कारवाई का करू नये, याविषयी नोटीस बजावली. या नोटिसाला उत्तर देण्यासाठी साळवी यांनी वेळ मागून घेतला होता. त्याप्रमाणे ते बुधवारी पोलीस उपायुक्त कार्यालयात जबाब देण्यासाठी आले होते. ठाकरे समर्थक शिवसैनिक साळवी यांच्या सोबत होते.

पोलिसांना जबाब देताना बंड्या साळवी यांनी तडीपारी नोटिसा पाठवून सतत मनस्ताप देण्यापेक्षा एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावा, असे आवाहन साळवी यांनी जबाबाच्या माध्यमातून पोलिसांना केले. बंड्या साळवींवरील कारवाईवरुन पोलीस व्दिधा मनस्थितीत आणि त्यांच्यावर वरुन राजकीय दबाव असल्याने ते काही बोलू शकत नसल्याचे कल्याण मधील काही शिवसैनिकांनी सांगितले. बंड्या साळवी हे कल्याणमधील एक वलयांकित नाव आहे. त्यांच्यावर कारवाई केली तर कायदा सुव्यवस्था, तणावाचे वातावरण शहरात तयार होईल अशी भीती पोलिसांना आहे. त्यामुळे कारवाई करण्यात पोलीस टाळाटाळ करत असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले.

हेही वाचा >>>ठाणे : आनंद दिघेंच्या स्मृतिस्थळावर ठाकरे गटाकडून शक्तिप्रदर्शन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीआधीच दर्शन घेऊन निघून गेले

शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी कल्याण डोंबिवली पालिका मुख्यालयासमोर ‘मी गद्दार नाही’ अशा आशयाचे फलक अज्ञात शिवसैनिकाने कल्याण शहर शिवसेना नावे लावले. या प्रकरणाचा गुन्हा जिल्हाप्रमुख म्हणून बंड्या साळवी यांच्यावर दाखल करण्यात आला. तडीपार प्रकरणी तुम्ही पुन्हा पोलीस ठाण्यात येऊ नका. आम्ही आमचा निर्णय तुम्हाला आठवड्यात कळवितो, असे पोलिसांनी साळवी यांना सांगितले.साळवी यांना तडीपार करू नये असा शिवसेनेच्या दोन्ही गटातील काही शिवसैनिकांचे मत आहे. तर कारवाई झालीच पाहिजे असा एक गट आग्रही असल्याचे कळते. उल्हासनगरचे राजेंद्र चौधरी, डोंबिवलीचे भाऊ चौधरी हे शिंदे गटाच्या दबावामुळेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षात दाखल झाले. त्याप्रमाणे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे एकनिष्ठ पालिका निवडणुकीपूर्वी शिंदे गटात दाखल करुन घेण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असल्याचे कळते. २७ गावातील एक अपक्ष माजी नगरसेवक शिंदे गटाकडून होणाऱ्या उपद्रवामुळे लवकरच राजकीय कवच म्हणून भाजपमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bandya salvi of kalyan appeals to the police to get rid of tadpari amy
First published on: 27-01-2023 at 14:51 IST