scorecardresearch

संथगती रस्ते, धूळ, कोंडीने डोंबिवलीकर त्रस्त; विद्यानिकेतन शाळेच्या बसवरील फलकाने वेधले लक्ष

विद्यानिकेतन शाळेच्या शालेय बसवर सुशिक्षित डोंबिवलीकर, राजकीय मंडळींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा फलक झळकत असल्याने हा फलक वाचण्यासाठी पादचाऱ्यांची झुंबड उडत आहे.

संथगती रस्ते, धूळ, कोंडीने डोंबिवलीकर त्रस्त; विद्यानिकेतन शाळेच्या बसवरील फलकाने वेधले लक्ष
विद्यानिकेतन शाळेच्या बसवरील फलकाने वेधले लक्ष (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

डोंबिवली – डोंबिवली शहराला कोणी वाली आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली असताना, विद्यानिकेतन शाळेच्या शालेय बसवर सुशिक्षित डोंबिवलीकर, राजकीय मंडळींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा फलक झळकत असल्याने हा फलक वाचण्यासाठी पादचाऱ्यांची झुंबड उडत आहे.

पुणे येथील कसबा पेठेतील निवडणुकीनंतर आता तरी शहाणे व्हा, असाच संदेश या फलकाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. डोंबिवली शहराच्या विविध भागांत सिमेंटची रस्ते कामे सुरू आहेत. ही कामे अतिशय संथगतीने सुरू आहेत. काँक्रिट रस्त्यांवर विहित कालावधीसाठी पाणी मारले जात नाही. त्यामुळे रस्त्यांना तडे जात आहेत. एमआयडीसीतील रस्त्यांची उंची लगतचे बंगले, कंपन्या, सोसायट्या यांच्या पायाची भौगोलिक उंची पाहून बांधणे गरजेचे असताना रस्ते दोन फूट उंच आणि लगतची घरे दोन फूट खाली, असे चित्र निर्माण झाले आहे. मानपाडा रस्त्याचे काम सुरू असल्याने या रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. त्यामुळे पर्यायी रस्त्यांवर धूळ आणि कोंडी असे चित्र दिसत आहे. या शहरात प्रशासन शिल्लक आहे की नाही. ठेकेदारांवर कोणाचे नियंत्रण आहे की नाही, असाच संदेश या फलकांमधून देण्यात आला आहे. रस्ते कामे करताना काही राजकीय मंडळी रुंदीकरण करून देत नसल्याने काही ठिकाणी रस्ते कामे खोळंबून राहिली आहेत. या कामात राजकीय मंडळी लक्ष घालत नसल्याने स्थानिकांना त्याचा त्रास होत आहे.

हेही वाचा – कल्याणमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पात काम करणाऱ्या कामगाराचा वीस फुटांवरून पडून मृत्यू

डोंबिवली शहरातील सुशिक्षित, शोषिक नागरिकांना फलकांमधून चिमटे घेण्यात आले आहेत. निवडणुका आल्या की फक्त घोषणाबाजी करून मते मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजकीय मंडळींचे लक्ष्य या फलकाच्या माध्यमातून वेधण्यात आले आहे. हे चित्र असेच राहिले तर पावसाळ्यात किती भयाण परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा संदेश फलकातून देण्यात आला आहे. व्हाॅट्सअ‍ॅपवरून समस्यांचे गाऱ्हाणे मांडणारा रस्त्यावर उतरणार नाही. त्यामुळे असुविधांचा सामना करत पुढे चालत राहायचे एवढेच या शहरातील रहिवाशांच्या नशिबी, असे फलकावर म्हटले आहे.

हेही वाचा – मेट्रो पाचच्या कारशेडचे भूसंपादन रखडलेल्या स्थितीतच; शेतजमिनीच्या दराबाबत अद्याप निश्चितता नाही

विद्यानिकेतन शाळेच्या बसवरील फलक वाचण्यासाठी, त्याची मोबाईलमधून छबी टिपण्यासाठी पादचाऱ्यांची झुंबड उडत आहे. डोंबिवलीतील नागरी समस्या मार्गी लावण्यासाठी एखादा विचारी गट असावा यासाठी विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित, सामाजिक कार्यकर्त्या प्रा. जयश्री कर्वे, महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या लता अरगडे, शैलेश भगत अशी विचारी मंडळी प्रयत्नशील आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-03-2023 at 16:26 IST
ताज्या बातम्या