बदलापूरः महापालिकांच्या पाणी वापर प्रमाणानुसार बारवी धरणग्रस्तांना नोकरी देण्यासाठी २२ जुलै रोज कल्याणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सोडत काढली जाणार आहे. तर १ ऑगस्ट या एमआयडीसी दिवसाचे औचित्य साधून ४१८ लाभार्थ्यांना नोकरीत रूजू करून घेण्याचा एमआयडीसी प्रशासनाचा मानस आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या संयुक्त बैठकीत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी याबाबत आदेश दिले. धरणग्रस्तांचा गेल्या सात वर्षांपासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. बारवी धरणातून पाणी घेणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणी वापराच्या प्रमाणात धरणग्रस्तांना नोकऱ्या द्यायच्या आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसी प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी २०९ लाभार्थ्यांना आपल्या विविध कार्यालयांमध्ये सामावून घेतले. मात्र पात्र ४१८ लाभार्थ्यांच्या नोकऱ्यांचा प्रश्न प्रलंबित होता. स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी एमआयडीसीकडे नोकऱ्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार गेल्या महिन्यात एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांनी सर्वच पालिकांना पत्र पाठवत या नोकऱ्या देण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर सुरू झालेल्या प्रक्रियेला गती मिळत नव्हती. त्यामुळे मंगळवारी बारवी धरणग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न सोडवण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक बोलावण्यात आली. केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, विविध पालिकांचे आयुक्त, मुख्याधिकारी, पुनर्वसन आणि एमआयडीसी अधिकारी उपस्थित होते. यावेळी नोकऱ्यांच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रचलित पद्धतीपेक्षा सोडत पद्धत राबवण्याच्या सूचना मंत्री पाटील यांनी यावेळी केल्या. तात्काळ त्यावर निर्णय होऊन २२ जुलै रोजी कल्याणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ही सोडत घोषीत करण्यात आली. ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ४१८ लाभार्थ्यांना १ ऑगस्ट रोजी रूजू होण्याचे पत्र देण्याचा मानस असल्याची माहिती एमआयडीसीचे विभागीय अभियंता सुधीर नागे यांनी दिली आहे. बुधवारपासून पात्र लाभार्थ्यांना सोडतीची माहिती देणारे पत्र दिले जाणार असून त्यांनी या सोडतीला आवर्जून उपस्थित राहावे अशी विनंती नागे यांनी केली आहे. बारवी धरणग्रस्तांना नोकरी देण्याची प्रक्रिया १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचे आदेशही यावेळी मंत्री कपिल पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे यंदा स्वातंत्रदिनी बारवी धरणग्रस्त नोकरीवर रूजू झाले असतील अशी आशा आहे. महिला, दिव्यांगांसाठी जवळच्या पालिका बारवीच्या पात्र लाभार्थ्यांमध्ये ४० महिला आणि ५ दिव्यांग लाभार्थ्यांचा समावेश आहे. त्यांना सोयीचे व्हावे म्हणून अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकांमध्ये त्यांना सामावून घेतले जाणार आहे. १ ऑगस्ट रोजी एमआयडीसी स्थापना दिवस असतो. त्या दिवशी या लाभार्थ्यांना रुजू करून घेण्याचा एमआयडीसीचा मानस आहे. चौकटः बारवी धरणाच्या तिसऱ्या टप्प्यात धरणाची उंची ६.५५ मीटरने वाढवण्यात आली. त्यामुळे धरणाची पाणी क्षमता थेट ३४०.४८ दशलक्ष घनमीटर इतकी झाली. यासाठी तोंडली, काचकोली, मोहघर, कोळे वडखळ, सुकाळवाडी, मानिवली या गावांचे विस्थापन झाले. यात १ हजार २०४ कुटुंब बाधीत झाले आहेत. त्यातील ४१८ जणांना आता नोकरी मिळणार आहे.