बदलापूर: ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणाच्या स्वयंचलित दरवाजातून होत असलेल्या पाणीगळतीची ”लोकसत्ता”ने दिलेल्या सविस्तर वृत्तानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे. तांत्रिक पथकाच्या माध्यमातून दरवाज्यांची किरकोळ दुरुस्ती करून सर्व दरवाजे व्यवस्थित केले आहेत. या तातडीच्या उपाययोजनेमुळे आता धरणाच्या एकाही दरवाजातून पाणीगळती होत नसून, दररोज वाया जाणाऱ्या लाखो लिटर पाण्याची नासाडी पूर्णपणे थांबली आहे.
यंदा पावसाला उशिरा सुरुवात झाल्यामुळे आणि पावसाचा लपंडाव सुरू असल्याने धरण भरण्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. अशा परिस्थितीत धरणाच्या चार स्वयंचलित दरवाज्यांमधून पाण्याची सतत गळती सुरू असल्याची धक्कादायक बाब काही दिवसांपूर्वी समोर आली होती. यातील दोन दरवाज्यांमधून मोठ्या प्रमाणावर, तर इतर दोन दरवाज्यांमधून किरकोळ स्वरूपात पाणी वाहून जात होते. एकीकडे पावसाची अनिश्चितता असताना, दुसरीकडे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात होती. या गंभीर प्रकाराबाबत ”लोकसत्ता”ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. पावसाळा सुरू असताना दरवाज्यांमधून होणाऱ्या या पाणीगळतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.
या वृत्ताची एमआयडीसीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी अत्यंत तातडीने आणि गंभीर दखल घेतली. बातमी प्रसिद्ध होताच एमआयडीसीच्या तांत्रिक पथकाने धरणावर धाव घेत दरवाज्यांची पाहणी केली. ही एक तांत्रिक बाब असल्याचे स्पष्ट करत प्रशासनाने युद्धपातळीवर देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेतले. दरवाज्यांना आवश्यक असलेली सर्व किरकोळ देखभाल पूर्ण करण्यात आली. यानंतर आता चारही स्वयंचलित दरवाजे पूर्णपणे सुरक्षित आणि व्यवस्थित बसले असून, त्यातून होणारी पाण्याची गळती शंभर टक्के थांबली आहे. सध्या धरणाच्या एकाही दरवाजातून पाण्याचा थेंबही वाया जात नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पावसाळ्यात धरणातून पाणी सोडण्याची गरज नसतानाही केवळ तांत्रिक बिघाडामुळे वाया जाणारे पाणी रोखण्यात यश आल्याने जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. प्रशासनाने वेळीच पावले उचलली आणि योग्य वेळी दुरुस्ती झाल्याने पाण्याचा मोठा अपव्यय टळला आहे. एमआयडीसीने दाखवलेल्या या तत्परतेबद्दल आणि पाण्याच्या नासाडीला लागलेल्या या ब्रेकमुळे आता नागरिकांमधूनही समाधान व्यक्त केले जात आहे.
बारवी धरण ८० टक्क्यांवर एमआयडीसी प्रशासनाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत धरण क्षेत्रात ३१.६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणाची पाणीपातळी आता ७०.३० मीटरवर पोहोचली आहे. सध्या धरणात २७३.६५ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा जमा झाला असून, हे प्रमाण एकूण क्षमतेच्या ८०.७६ टक्के इतके आहे. धरण क्षेत्रात यंदाच्या हंगामातील एकूण पावसाची नोंद आता १९१४.२० मिलीमीटरवर पोहोचली आहे. फोटो आहे
