बदलापूर: ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या बारवी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठ्याने नव्वद टक्क्यांचा टप्पा ओलांडला असून धरण पूर्ण भरण्याच्या स्थितीत पोहोचले आहे. त्यामुळे धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता निर्माण झाली असून, धरणातून बारवी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बारवी नदीकाठच्या गावांना आणि प्रशासकीय यंत्रणांना अत्यंत तातडीचे सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
एमआयडीसीच्या अंबरनाथ येथील बारवी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता उमेश देशमुख यांनी ३ ऑगस्ट २०२६ रोजी कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर आणि मुरबाड येथील तहसीलदारांना एक अत्यंत तातडीचे पत्र पाठवून या संभाव्य विसर्गाबाबत माहिती दिली आहे. या पत्रकानुसार, धरणाची पाणीपातळी ७१.६४ मीटरवर पोहोचली असून धरणात ९०.९९ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. धरणाची पूर्ण भरण्याची म्हणजेच ओव्हरफ्लो पातळी ७२.६० मीटर इतकी आहे. पाणलोट क्षेत्रातून धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह कोणत्याही क्षणी वाढू शकतो. त्यामुळे धरणाची जलाशय पातळी वाढून बारवी धरणाचे स्वयंचलित वक्रद्वारे उघडण्याची शक्यता आहे आणि परिणामस्वरुप बारवी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू होईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
धरणातून विसर्ग सुरू झाल्यानंतर बारवी नदीच्या पाणीपातळीत अचानक मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे अनुचित घटना टाळण्यासाठी प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषतः आसनोली, चांदप, चांदपपाडा, पिंपळोली, सागांव, पाटीलपाडा, पादीरपाडा, कारंद, मोऱ्याचापाडा, चोण, रहाटोली, आघाणवाडी, फणसवाडी, वाकडीचीवाडी व नदी काठावरील इतर शहरे येथील सरकारी यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या गावातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांनी स्थानिक नागरिकांना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याबाबत तातडीने अवगत करावे, अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे. तसेच, या काळात नागरिकांनी आणि पर्यटकांनी कोणत्याही प्रकारे वाहत्या पाण्यात प्रवेश करू नये, तसेच नदीच्या पात्रात पोहण्यास मज्जाव करण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्सून पूर्वतयारीच्या सूचनेनुसार बारवी धरणाकरिता एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाचा भ्रमणध्वनी क्रमांक ७५०७८३४५०४ असा असून, तो माहिती व कार्यवाहीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. वाढत्या पावसामुळे प्रशासनाने सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले असून नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
