ठाणे : गेल्या दोन महिन्यांपासून पूर्ण क्षमतेने भरून असलेल्या बारवी धरणातील पाणीसाठ्यात आता घट होण्यास सुरुवात झाली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत धरण १०० टक्के भरलेले होते. मात्र, त्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून थांबेल पासून, वाढलेली उष्णता आणि दैनंदिन पाणीवापरात होणारी वाढ यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस धरणातील पाणीसाठा ९५ टक्क्यांवर आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच कालावधीत बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले होते. त्यामुळे यंदा धरणातील पाणीसाठ्यात झालेली घट लक्षात घेता, आगामी काळात आणि पुढील वर्षी जून-जुलैपर्यंत उपलब्ध पाणी पुरविण्याचे आव्हान पाणीपुरवठा विभागासह जिल्हा प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीच्या काळात पावसाने असमाधानकारक हजेरी लावली होती. त्यानंतर जुलै ते ऑगस्ट काही काळ धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांच्या पाणीपुरवठ्याबाबत तूर्तास दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पावसाळा संपल्यानंतर पावसाने पूर्णपणे दडी मारली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा अभाव, वाढते तापमान आणि पिण्याच्या पाण्यासह विविध कारणांसाठी सुरू असलेला नियमित पाणीवापर यामुळे धरणातील साठा हळूहळू कमी होऊ लागला आहे. ऑक्टोबरअखेरीस पाणीसाठा ९५ टक्क्यांवर आल्याने आगामी काळातील पाणी नियोजनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बारवी धरण हे ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या जलस्रोतांपैकी एक असून, ठाणे जिल्ह्यातील विविध शहरे आणि औद्योगिक क्षेत्रांच्या पाणीपुरवठ्यात या धरणाची महत्त्वाची भूमिका आहे. अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली आणि परिसरातील नागरी व औद्योगिक पाणीपुरवठ्यासाठी बारवी धरणातील पाणीसाठा महत्त्वाचा आहे. त्यामुळे धरणातील साठ्यात होणारी घट ही केवळ धरणापुरती मर्यादित बाब नसून, आगामी महिन्यांतील पाणीपुरवठ्याच्या नियोजनाच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे.

दरम्यान, यंदा पाऊस कमी पडल्याने आणि काही कालावधीत पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने पाणीटंचाईची चिंता वाढली आहे. यंदा पावसाची स्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यातील विविध स्थानिक प्रशासनांनी नियोजित पाणी कपात लागू केली आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करणे आणि पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक बनले आहे. धरणातील साठा सध्या ९५ टक्के असला, तरी पुढील सात ते आठ महिन्यांत पाण्याची मागणी कायम राहणार आहे. उन्हाळ्यात तापमान वाढल्यानंतर पाण्याचा वापरही वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे सध्याचा साठा पुढील वर्षी जून-जुलैपर्यंत पुरविण्यासाठी पाणीपुरवठा विभाग आणि जिल्हा प्रशासनाला आतापासूनच नियोजन करावे लागणार आहे.

एकीकडे गेल्या वर्षी याच कालावधीत धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असताना यंदा पाणीसाठा ९५ टक्क्यांवर आला आहे, तर दुसरीकडे पावसाळा संपल्याने धरणात नव्याने पाणी जमा होण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा वापर, संभाव्य पाणीटंचाई आणि शहरांच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन या बाबींवर प्रशासनाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता वाढू नये, यासाठी नागरिकांनीही पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. बारवी धरणातील पाणीसाठा सध्या समाधानकारक पातळीवर असला, तरी त्यात सुरू झालेली घट आणि पुढील पावसाळ्यापर्यंतचा मोठा कालावधी लक्षात घेता, उपलब्ध जलसाठा टिकवून ठेवणे हेच आता प्रशासनासमोरील प्रमुख आव्हान ठरणार आहे.