Barvi Dam Water Level Update: ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरण क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या दमदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात अत्यंत वेगाने वाढ होत असून, अवघ्या काही दिवसांतच धरणातील पाणीसाठ्याने ३० टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे. पाऊस जोरदार बरसत असल्याने ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांवरील पाणीटंचाईचे मोठे संकट टळण्याची आशा आहे.
यंदाच्या वर्षात जून महिन्यात पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे जलसाठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली होती. पावसावर एल निनोचा प्रभाव असल्याने पाणी कपात लागू करण्यात आली होती. जून महिन्याच्या अखेरीस धरणातील पाणीसाठा २१.७४ टक्क्यांपर्यंत खाली आला होता, ज्यामुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली होती. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दमदार पुनरागमन केले. सोमवार, ६ जुलै रोजी सकाळी मिळालेल्या आकडेवारीनुसार, धरणातील पाणीसाठा ३०.०६ टक्क्यांवर पोहोचला आहे. अवघ्या एका दिवसात साठ्यात तब्बल ४ टक्क्यांची वाढ झाली आहे. कालच्या २६.३५ टक्क्यांवरून ३०.०६ टक्क्यांवर पाणी साठा पोहोचला. सध्या धरणाचा जिवंत पाणीसाठा १०१.८८ दशलक्ष घनमीटर झाला असून, पाण्याची पातळी ६०.१८ मीटरवर पोहोचली आहे.
सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी पाऊस
गेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाची संततधार आणि जोरदार वृष्टी सुरू आहे. शनिवार ४ जुलै रोजी धरण क्षेत्रात या हंगामातील पहिला मोठा अर्थात १६२.४० मिलीमीटर पाऊस झाला होता. त्यानंतर रविवार, ५ जुलै रोजी सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने आपला जोर कायम ठेवत १५७.४० मिलीमीटर पावसाची नोंद केली आहे. या सलगच्या पावसामुळे यंदाच्या हंगामातील एकूण सरासरी पाऊस आता ६२८.०० मिलीमीटरवर पोहोचला आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत अद्यापही निम्मी तूट
सद्यस्थितीत पाणीसाठ्यात समाधानकारक आणि वेगवान वाढ होत असली तरी, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरण पातळी अजूनही खूपच मागे आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ६ जुलै २०२५ रोजी धरणात तब्बल ६३.५३ टक्के (२१५.२८ घन मीटर) पाणीसाठा उपलब्ध होता आणि पावसाची एकूण नोंद १४१७.०० मिलीमीटर इतकी होती. यंदा पावसाने उशिरा आणि संथ सुरुवात केल्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत साठा निम्म्याहून कमी आहे. बारवी धरणाची पूर्ण भरण्याची (ओव्हरफ्लो) पातळी ७२.६० मीटर इतकी आहे. सुरुवातीला पावसाने दिलेली मोठी ओढ पाहता चिंता वाढली होती, मात्र जुलैच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने ही तूट भरून काढण्यास सुरुवात केली आहे. पावसाचा हाच जोर आगामी काळातही असाच कायम राहिल्यास बारवी धरण लवकरच समाधानकारक पातळी गाठेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
