बदलापूर: ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरण क्षेत्रात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या संततधारेमुळे धरणाच्या पाणीसाठ्यात अत्यंत वेगाने वाढ होत असून, अवघ्या एका दिवसात पाणीसाठ्यात तब्बल ५ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली आहे. मंगळवार, ७ जुलै रोजी सकाळी धरणातील पाणीसाठा ३५.८७ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण डोंबिवलीसह आणि ठाणेकरांवरील पाणीटंचाईचे संकट आता वेगाने दूर होताना दिसत आहे.

जून महिन्याच्या अखेरीस पावसाने दडी मारल्याने पाणीबाणीचे सावट निर्माण झाले होते. ३० जून रोजी धरणातील साठा अवघ्या २१.७४ टक्क्यांपर्यंत खाली आला होता. मात्र, जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने जोमात पुनरागमन केले. ५ जुलैला धरणात २६.३५ टक्के पाणीसाठा होता, तो ६ जुलैला ३०.०६ टक्के वर पोहोचला. आज, ७ जुलै रोजी प्राप्त ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत धरण क्षेत्रात १४९.८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून साठा थेट ३५.८७ टक्क्यांवर गेला आहे. म्हणजेच एकाच दिवसात धरणाच्या पाणीसाठ्यात ५.८१ टक्क्यांची मोठी भर पडली आहे. सध्या धरणाचा जिवंत पाणीसाठा १२१.५७ दशलक्ष घनमीटर इतका झाला असून, पाण्याची पातळी ६१.६४ मीटरवर पोहोचली आहे.

पावसाची सलग जोरदार बॅटिंग

धरण क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची सलग आणि जोरदार बॅटिंग सुरू आहे. ५ जुलै रोजी १६२.४० मिमी, ६ जुलै रोजी १५७.४० मिमी आणि आज ७ जुलै रोजी १४९.८० मिमी पाऊस बरसला आहे. या सलगच्या मुसळधार पावसामुळे यंदाच्या हंगामातील एकूण सरासरी पर्जन्यमान आता ७७७.८० मिलीमीटरवर पोहोचले आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत अद्यापही तूट कायम

सद्यस्थितीत पाणीसाठ्यात समाधानकारक आणि अत्यंत वेगवान वाढ होत असली तरी, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरण पातळी अजूनही मागेच आहे. गेल्या वर्षी याच दिवशी म्हणजे ७ जुलै २०२५ रोजी धरणात तब्बल ६६.७८ टक्के म्हणजे २२६.३१ दशलक्ष घन मीटर पाणीसाठा उपलब्ध होता आणि पावसाची एकूण नोंद १४९४.०० मिलीमीटर इतकी झाली होती. यंदा पावसाने उशिरा सुरुवात केल्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत साठा अजूनही निम्म्याहून थोडा जास्त आहे. बारवी धरणाची पूर्ण भरण्याची पातळी ७२.६० मीटर इतकी आहे. सुरुवातीला पावसाने दिलेली मोठी ओढ पाहता चिंता वाढली होती, मात्र आता धरणात येणाऱ्या पाण्याची आवक प्रचंड वाढली आहे. पावसाचा हाच जोर आगामी काळातही असाच कायम राहिल्यास बारवी धरण लवकरच समाधानकारक पातळी गाठेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

उल्हास नदीची पाणी पातळी घटली

सोमवारी रायगड जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत बदलापूर शहरात मोठी वाढ झाली होती. सोमवारी सायंकाळच्या सुमारास उल्हास नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत होते. परिणामी बदलापूर आणि कल्याण ग्रामीण भागातील गावांना पुराचा धोका निर्माण झाला होता. मात्र मंगळवारी सकाळी पाण्याची पातळी कमी झाली. मंगळवारी सकाळी नऊ वाजता उल्हास नदी १४.१४ मीटर वरून वाहत होती. उल्हास नदीची इशारा पातळी १६.५० मीटर असून धोका पातळी १७.५० मीटर इतकी आहे.