Barvi dam water level update: संपूर्ण जून महिना जवळपास कोरडा गेल्याने ठाणे जिल्ह्यावर ओढवलेले पाणीटंचाईचे गडद संकट आता झपाट्याने दूर होताना दिसत आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच बारवी धरण क्षेत्रात पावसाने दमदार फलंदाजी सुरू केली आहे. त्यामुळे बारवी धरणात बुधवारी, ८ जुलै रोजी विक्रमी पाणीसाठा झाला. धरण क्षेत्रात गेल्या २४ तासांत तब्बल २४७.८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, या विक्रमी पावसामुळे अवघ्या एका दिवसात धरणाच्या पाणीसाठ्यात जवळपास ९ टक्क्यांची अभूतपूर्व वाढ झाली आहे.
यंदा पावसाने सुरुवातीला मोठी ओढ दिल्याने जून अखेरीस धरणातील पाणीसाठा अवघ्या २१ टक्क्यांवर आला होता. त्यामुळे अंबरनाथ, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर आणि ठाणे शहरात पाणीबाणीची मोठी धास्ती निर्माण झाली होती. मात्र, जुलैच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने जोरदार कमबॅक करत धरणाला अक्षरशः नवसंजीवनी दिली आहे.
मंगळवार, ७ जुलै रोजी धरणात ३५.८७ टक्के पाणीसाठा होता. मात्र, बुधवार, ८ जुलै मिळालेल्या माहितीनुसार हा साठा थेट ४४.७५ टक्क्यांवर पोहोचला आहे. म्हणजेच अवघ्या २४ तासांत साठ्यात ८.८८ टक्क्यांची विक्रमी वाढ झाली आहे. सध्या धरणाचा जिवंत पाणीसाठा १५१.६४ दशलक्ष घनमीटर इतका झाला असून, पाण्याची पातळी ६३.८० मीटरवर पोहोचली आहे. धरणाची ओव्हरफ्लो पातळी ७२.६० मीटर आहे.
हंगामातील पावसाने ओलांडला हजाराचा टप्पा
बुधवारी नोंदवल्या गेलेल्या २४७.८० मिलीमीटर या मुसळधार पावसामुळे यंदाच्या हंगामातील एकूण सरासरी पावसाने एक हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला असून, तो आता १०२५.६० मिलीमीटरवर पोहोचला आहे.
गेल्या वर्षाशी तुलना
सध्या धरणात पाण्याची आवक अत्यंत वेगाने होत असली तरी, मागील वर्षाच्या तुलनेत पावसाची आणि पाणीसाठ्याची आकडेवारी अद्याप मागे आहे. गेल्या वर्षी याच दिवशी (८ जुलै २०२५) धरणात तब्बल ६९.१२ टक्के (२२३.२१ दशलक्ष घन मीटर) पाणीसाठा उपलब्ध होता आणि पावसाची एकूण नोंद १५१७.०० मिलीमीटर इतकी झाली होती.
असे असले तरी, जून महिन्यातील भीषण कोरडी परिस्थिती पाहता, जुलैच्या पहिल्या आठवड्यातच धरण ४५ टक्क्यांच्या उंबरठ्यावर पोहोचणे हा ठाणे जिल्ह्यासाठी अत्यंत मोठा आणि सुखद दिलासा मानला जात आहे. पावसाचा हाच जोर कायम राहिल्यास बारवी धरण लवकरच समाधानकारक पातळी गाठून पाणीटंचाईचे सावट कायमचे दूर होईल, असा विश्वास निर्माण झाला आहे.
