बदलापूर: ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर परिसराची तहान भागवणाऱ्या बारवी धरण क्षेत्रात यंदाच्या हंगामातील पहिला मोठा पाऊस बरसला आहे. रविवारी, ५ जुलै रोजीच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत धरण क्षेत्रात तब्बल १६२.४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या दमदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, तो आता २६.३५ टक्क्यांवर (८९.३१ घन मीटर जिवंत साठा) पोहोचला आहे.
गेले काही दिवस धरण क्षेत्रात पाऊस संथ गतीने बरसत होता. ३० जून रोजी धरणातील साठा २१.७४ टक्क्यांपर्यंत खाली आल्याने चिंतेचे वातावरण होते. १ जुलैपासून पावसाने थोडीफार हजेरी लावण्यास सुरुवात केली, मात्र एका दमदार पावसाची प्रतीक्षा होती. अखेर कालपासून झालेल्या या हंगामातल्या पहिल्याच मोठ्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात एका दिवसात सुमारे तीन टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. त्यामुळे पाणीसाठा थेट २३.५५ टक्क्यावरून २६.३५.टक्क्यांवर पोहोचला. सध्या धरणाची पाणीपातळी ५९.०५ मीटरवर पोहोचली आहे.
पावसाच्या या पुनरागमनामुळे मोठा दिलासा मिळाला असला तरी, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरण पातळी अद्यापही मागे आहे. आजअखेर धरण क्षेत्रात एकूण ४७०.६० मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, गेल्या वर्षी ५ जुलै रोजी धरणात ६०.६८ टक्के अर्थात २०५.६१ घन मीटर पाणीसाठा होता आणि तब्बल १३४७ मिमी पाऊस झाला होता. असे असले तरी, या पहिल्या मोठ्या पावसामुळे नवसंजीवनी मिळाली असून पाणीटंचाईचे सावट काहीसे दूर होण्यास मदत झाली आहे. आगामी काळात पावसाचा हा जोर असाच कायम राहिल्यास बारवी धरण लवकरच समाधानकारक पातळी गाठेल, अशी आशा निर्माण झाली आहे.
उल्हास नदीची पाणी पातळी
बदलापूर येथे असलेल्या नदीची पाणी पातळी केंद्रावर नोंदवलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, शनिवारी सायंकाळी ५ वाजता नदीची पाणीपातळी १२.७८ मीटर इतकी होती. मात्र, अवघ्या चार तासांत म्हणजेच रात्री ९ वाजता हीच पातळी वाढून १४.११ मीटरवर पोहोचली होती. त्यामुळे रात्री बदलापूर शहरातील नदी किनारी असलेल्या रहिवाशांमध्ये पुराची भीती होती. मात्र रविवारी सकाळी सात वाजताच्या नोंदीनुसार पाण्याची पातळी एक मीटरने कमी होऊन १३.८० मीटरवर पोचली होती. उल्हास नदीची इशारा पातळी १६.५ मीटर तर धोका पातळी १७.५ मीटर इतकी निश्चित करण्यात आली आहे.
