बदलापूर: संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असून धरण आता काठोकाठ भरले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरण प्रशासनाने गुरुवारी सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार, धरणातील पाणीसाठ्याने ९७.३४ टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे.
धरणाची पाणीपातळी ७२.३५ मीटरवर पोहोचली असून, धरण ओसंडून वाहण्यासाठी आता अवघ्या ०.२५ मीटरची आवश्यकता आहे. धरणाची ओसंडून वाहण्याची पातळी ७२.६० मीटर आहे. त्यामुळे पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास अवघ्या काही तासांतच धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहण्याची शक्यता निर्माण झाली असून सर्वांनाच या क्षणाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात बारवी धरण भरण्याचा प्रवास अत्यंत संथ आणि चढ-उतारांचा राहिला आहे. सुरुवातीला जून महिना कोरडा गेल्याने चिंता वाढली होती. त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात दमदार पावसाने धरण ४८ टक्क्यांवर पोहोचले, मात्र पुन्हा पावसाने ओढ दिल्याने १६ जुलैपर्यंत धरण जेमतेम ५० टक्क्यांवर रेंगाळले होते. १९ जुलै रोजी धरणाने ५४ टक्क्यांचा टप्पा गाठला.
याचदरम्यान धरणाच्या स्वयंचलित दरवाज्यांमधून पाण्याची गळती होत असल्याचे वृत्त ”लोकसत्ता”ने दिले होते, ज्याची दखल घेत एमआयडीसीने तातडीने दुरुस्ती करून पाण्याची मोठी नासाडी रोखली. त्यानंतर जुलै अखेरीस पावसाने पुन्हा जोर धरल्याने २६ जुलैला ७३ टक्के, २७ जुलैला ७६ टक्के आणि २९ जुलैला धरणाने ८० टक्क्यांची मजल मारली. ऑगस्टच्या सुरुवातीला पावसाने अक्षरशः झोडपून काढल्याने ३ ऑगस्टला धरणाने ९० टक्क्यांचा टप्पा ओलांडला आणि गुरुवारी, ६ ऑगस्टला धरण ९७.३४ टक्क्यांवर पोहोचले आहे. पाणी भरण्याच्या या प्रत्येक टप्प्यावर पावसाचा लपंडाव पाहायला मिळाला असला तरी, अखेर धरण पूर्ण भरण्याच्या स्थितीत आल्याने जिल्ह्यावरील पाणीटंचाईचे सावट कायमचे दूर झाले आहे.
गुरुवारी सकाळच्या आकडेवारीनुसार, धरण क्षेत्रात चोवीस तासांत २४.२० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, यंदाच्या हंगामातील एकूण पाऊस २२३२.८० मिलीमीटरवर पोहोचला आहे. सध्या धरणात ३२९.८१ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. विशेष म्हणजे, जुलै महिन्यापर्यंत यंदाचे धरण मागील वर्षाच्या तुलनेत मागे होते, मात्र आता पावसाच्या दमदार पुनरागमनाने हे चित्र पालटले आहे.
गेल्या वर्षी याच दिवशी म्हणजे ६ ऑगस्ट २०२५ रोजी धरण क्षेत्रात १९६१.०० मिलीमीटर पाऊस झाला होता आणि धरणात ९५.७५ टक्के, ३२४.४३ दशलक्ष घन मीटर पाणीसाठा होता. म्हणजेच, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा धरणात पाणीसाठा आणि पावसाची नोंद दोन्हीही अधिक आहे. धरणाची पाणीपातळी आता ओव्हरफ्लो लेव्हलच्या अगदी समीप आल्याने स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आधीच बारवी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून, आता केवळ धरण ओसंडून वाहण्याची प्रतीक्षा आहे.
