खाडीकिनारा मार्ग कठीण

घोडबंदर मार्गाला पर्याय म्हणून आखलेल्या बाळकुम ते गायमुख या १३ किमी अंतराच्या खाडीकिनारा मार्गाच्या सुधारित अंदाजपत्रकास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत नुकतीच मंजुरी मिळाली आहे.

भूसंपादनासह विविध पर्यावरण मंजुऱ्या आणि खर्चाचे अडथळे

जयेश सामंत, सागर नरेकर

ठाणे:  घोडबंदर मार्गाला पर्याय म्हणून आखलेल्या बाळकुम ते गायमुख या १३ किमी अंतराच्या खाडीकिनारा मार्गाच्या सुधारित अंदाजपत्रकास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत नुकतीच मंजुरी मिळाली आहे. मात्र, त्यासाठीच्या जमिनीचे संपादन, पर्यावरण मंजुऱ्या आणि प्रकल्पाचा वाढता खर्च यामुळे या मार्गाच्या उभारणीत अडथळे येण्याची शक्यता आहे. 

विशेष म्हणजे, २०१६मध्ये या प्रकल्पाचा अंदाजित खर्च एक हजार कोटींच्या घरात असताना पाच वर्षांत त्याचे प्रशासकीय अंदाजपत्रक ३०० कोटी रुपयांनी वाढले आहे. विविध अडथळे पार करून प्रत्यक्ष निविदा प्रक्रियेनंतर या प्रकल्पाचा खर्च किती तरी कोटींनी वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

एमएमआरडीएच्या डिसेंबर २००७ मध्ये झालेल्या बैठकीत ठाणे शहरातील महत्त्वाकांक्षी अशा बाळकुम ते गायमुख या ठाणे खाडीकिनारा मार्गाला पहिल्यांदा मंजुरी देण्यात आली होती. तेव्हा या कामासाठी अंदाजित खर्च १२० कोटी इतका गृहीत धरण्यात आला होता. प्राथमिक अभ्यासानंतर पाच वर्षांनी हा खर्च ३१० कोटींपर्यंत पोहोचला होता. नंतर महाराष्ट्र सागरी किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन  प्राधिकरण आणि नौदलाने सुचवलेल्या बदलांमुळे प्रकल्पाचा खर्च कागदावरच एक हजार कोटींवर गेला. ठाणे महापालिकेने या प्रकल्पाचा सुधारित अहवाल बनवण्यासाठी मे. टंडन अर्बन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या सल्लागार संस्थेची नेमणूक केली होती. सल्लागार संस्थेचा अहवाल ठाणे महापालिकेने एमएमआरडीएला ८ फेब्रुवारी २०२१ रोजी सादर केला होता. या अहवालानुसार रस्त्याचे बांधकाम दोन टप्प्यांमध्ये करणे प्रस्तावित करण्यात आले. यातील पहिल्या टप्प्यात मुख्य रस्त्याचे बांधकाम करणे तसेच दुसऱ्या टप्प्यात मुख्य रस्त्यास छेदून जाणाऱ्या इतर रस्त्यांच्या चौकांच्या ठिकाणी क्लोव्हरलिफचे बांधकाम करणे अशा एकूण १ हजार ५४५ कोटी ३१ लाख रुपयांचा अंदाजे खर्चाचा अहवाल देण्यात आला होता. 

 हा मार्ग बाळकुम, कोलशेत, वाघबीळ, ओवळा, कासारवडवली आणि मोघरपाडा या गावांमधून जात असून रस्त्याकरिता खासगी जमिनींसहित महाराष्ट्र शासन, ठाणे महानगरपालिका, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि वन विभागाच्या अधिपत्याखालील जमिनींचे अधिग्रहण करणे आवश्यक आहे. रस्त्याच्या बांधकामाकरिता आवश्यक जमिनीपैकी किमान ६० टक्के भूसंपादन झाल्यानंतर तसेच हे भूसंपादन सलग लांबीत झाल्यानंतरच रस्त्याच्या कामास सुरुवात करणे अशा मुख्य अटींचा समावेश होता. या सर्व अटींनंतर सुमारे १ हजार ३१६ कोटी १८ लाखांचे सुधारित अंदाजपत्रकाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.

रस्त्याचे महत्त्व

बाळकुम ते गायमुख ठाणे खाडीकिनारा रस्ता ठाणे महानगरपालिकेच्या विकास आराखडय़ानुसार असून त्याची लांबी १३.४३ किलोमीटर आणि रुंदी ४० ते ४५ मी. इतकी आहे. एमएमआरडीएच्या सर्वसमावेशक वाहतूक आराखडय़ातील आणि प्रादेशिक विकास आराखडय़ातील मुख्य रस्ता आहे. तसेच ठाणे शहराच्या सर्वसमावेशक वाहतूक आराखडय़ातही या रस्त्याला महत्त्वाचे स्थान आहे. हा रस्ता मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील बाळकुमजवळील खारेगाव टोल नाका येथून सुरू होऊन घोडबंदर रस्त्यावरील गायमुखपर्यंत आहे. त्यामुळे ठाणे शहराच्या दृष्टीने या रस्त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा रस्ता काँक्रीट रस्त्याला छेदून जात असल्यामुळे मेट्रो मार्गिका ओलांडण्यासाठी दुसऱ्या पातळीवरील उड्डाणपुलाचे काम करावे लागणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bayroute difficult road ysh

Next Story
गुन्हेवृत्त : जिल्ह्यत दुचाकी चोरांचा उच्छाद
ताज्या बातम्या