कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील सर्व वर्दळीच्या, अंतर्गत रस्त्यांवर एकही खड्डा दिसता कामा नये. दिवस-रात्र कामे करुन खड्डे बुजविण्याची कामे प्राधान्याने पूर्ण करा, असे आदेश आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी बांधकाम विभागाला दिल्याने बांधकाम विभागाचे अभियंते रात्री ११ ते पहाटे पाच वाजेपर्यंत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणेशोत्सवापूर्वी ही कामे प्राधान्याने पूर्ण करा अशा आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना आहेत. रात्रीच्या वेळेत वाहनांची वर्दळ कमी असल्याने कामगारांना खड्डे भरणीची कामे सुस्थितीत करतात येतात. दिवसा सतत वाहनांची वर्दळ असल्याने कामे थांबवून, केलेल्या खडी भरणीच्या कामावरुन अवजड ट्रक, वाहने जात असल्याने भरलेली खडी खड्डया बाहेर येते. त्यामुळे खड्डे भरणीची कामे रात्रीच्या वेळेत केली जात आहेत.

डोंबिवली विभागात गेल्या पाच दिवसांपासून डोंबिवली बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे शहराच्या विविध भागातील रस्त्यांची पाहणी उपअभियंता, साहाय्यक अभियंत्यांच्या उपस्थितीत करतात. ज्या रस्त्यांवर सर्वाधिक खड्डे पडले आहेत. असे रस्ते रात्रीतून खड्डे बुजविण्याच्या कामासाठी निवडले जातात. खड्डे बुजविण्याची कामे केल्यानंतर दररोज आयुक्तांना केलेल्या कामांची माहिती दिली जाते, असे कार्यकारी अभियंता लोकरे यांनी सांगितले.

खड्ड्यांविषयी नागरिकांच्या पालिकेत तक्रारी येता कामा नयेत आणि समाज माध्यमांवर याविषयी चर्चा होता कामा नये, अशा सूचना वरिष्ठांनी अभियंत्यांना दिल्याने सर्व अभियंते झटून कामाला लागले आहेत. टिटवाळा, कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली, २७ गाव भागात ही कामे सुरू करण्यात आली आहेत.

कोल्डमिक्सचा वापर
खडी चुरा, सिमेंट, घट्ट रसायनाचा वापर करुन तयार केलेले मिश्रण आता खड्डे भरणी कामासाठी वापरले जात आहे. डोंबिवलीतील दत्तनगर चौक ,घरड सर्कल चौक, सागर्ली रस्ता, शिवमंदिर रस्ता, डाॅ. राजेंद्रप्रसाद रस्ता, नेरुरकर रस्ता, कल्याण पूर्वेतील चिंचपाडा, आडिवली, ठाकुर्ली ९० फुटी रस्ता भागातील रस्ते कोल्डमिक्सने भरण्यात आले आहेत. मानपाडा छेद रस्त्यावरील आईस फॅक्टरी जवळील अभिनव शाळेकडील रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. पावसाने उघडीप दिली की या रस्त्याचे काँक्रीटकरणाचे काम सुरू केले जाणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता लोकरे यांनी दिली.

काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यापूर्वी डोंबिवली वाहतूक विभागाकडून पर्यायी रस्त्याची व्यवस्था या भागात केली जाणार आहे. तसे पत्र वाहतूक विभागाला बांधकाम विभागाकडून देण्यात येईल. वाहतूक विभागाने पालिकेला या कामासाठी सहकार्य केले आहे. त्यामुळे त्यांचे सहकार्य मिळेल असा विश्वास लोकरे यांनी व्यक्त केला. वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्याने या रस्ते कामासाठी पालिकेचा प्रस्ताव आला तर त्याचा नक्की विचार करुन त्यांना सहकार्य करू, असे सांगितले.

गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्ते खड्डे भरुन सुस्थितीत असले पाहिजेत असे आयुक्तांचे आदेश आहेत. नागरिकांना खड्ड्यांमुळे त्रास होता कामा नये अशा सूचना आयुक्तांच्या असल्याने रात्रीच्या वेळेत वाहनांची वर्दळ कमी होताच रात्री ११ ते पहाटे पाच वाजेपर्यंत खड्डे भरणीची कामे ठेकेदारांकडून करुन घेतली जात आहे. या कामाच्या ठिकाणी पालिका अभियंता देखरेख ठेवत आहेत. – रोहिणी लोकरे ,कार्यकारी अभियंता ,डोंबिवली विभाग

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Before ganeshotsav no potholes should be seen on the roads commissioner dr bhausaheb dangde amy
First published on: 15-08-2022 at 12:32 IST