मीरा-भाईंदरमध्ये भिकाऱ्यांचा वाढता उपद्रव

१५ वर्षांत एकाही भिकाऱ्यावर कारवाई नाही

(संग्रहित छायाचित्र)

१५ वर्षांत एकाही भिकाऱ्यावर कारवाई नाही

मीरा-भाईंदरच्या मुख्य रस्त्यावरचे नाके, सिग्नल, धार्मिक स्थळे या ठिकाणी भिकाऱ्यांचा उच्छाद वाढू लागला आहे. मात्र मीरा-भाईंदरमध्ये गेल्या अनेक वर्षांत ‘भीक प्रतिबंधक कायद्या’ची अंमलबजावणीच करण्यात आली नसल्याची बाब उघडकीस आली आहे.

चोरी, दरोडा, हत्या, अपहरण, लैंगिक अत्याचारांची वाढती जंत्री मीरा-भाईंदरच्या प्रत्येक पोलीस ठाण्यातील फलकावर झळकताना दिसून येते; परंतु भीक मागितल्याप्रकरणी कारवाई केल्याची एकही नोंद शहरातल्या सहा पोलीस ठाण्यांत दाखल झालेली नाही. मीरा रोड उपअधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीवरून हे स्पष्ट झाले आहे.  पोलिसांच्या दृष्टीने येथे एकही भिकारी नसल्याचे दिसून येत असले तरी नागरिकांना मात्र रोज भिकाऱ्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

भिकाऱ्यांकडील मुले त्यांचीच आहेत का?

हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या ‘मुस्कान’ या मोहिमेअंतर्गत अनेक वेळा लहान मुले भीक मागत असताना आढळून आली आहेत. त्यामुळे भीक मागणाऱ्यांजवळ असणारी मुले खरोखर त्यांचीच आहेत का याचा शोध घेण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Beggars increase at mira bhayandar