डोंबिवली- बनारसहून मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनसकडे निघालेली एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्थानकातून सुटताच एका डब्यातून धूर येत असल्याची माहिती रेल्वे परिचालन नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांना दिसले. नियंत्रण कक्षाच्या सूचनेवरून डोंबिवली रेल्वे स्थानक अधिकाऱ्यांनी बनारस एक्सप्रेसच्या लोको पायलटला एक्सप्रेस डोंबिवली रेल्वे स्थानकात थांबविण्यास सांगितले. मंगळवारी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान हा प्रकार घडला.
डोंबिवली रेल्वे स्थानकात अचानक एक्सप्रेस थांबविण्याचा इशारा स्थानक व्यवस्थापक जी. के. साहू, पाॅईन्टमन हनुमंता सरवदे यांच्याकडून मिळताच, एक्सप्रेसचे लोको पायलटही आश्चर्यचकीत झाले. रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच वर एक्सप्रेस थांबविण्यात आली. नियंत्रण कक्षातून देण्यात आलेल्या इशाऱ्याची माहिती लोको पायलटला स्थानक व्यवस्थापक साहू यांनी दिली. एक्सप्रेसच्या एस ६ डब्यातून धूर येत असल्याचे दूरसंवेदन यंत्रणेतून रेल्वे नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांना दिसले होते. लोको पायलट, सह पायलट यांनी तात्काळ एस ६ डब्याजवळ जाऊन त्या डब्यातील तांत्रिक वस्तूंची हाताळणी केली. वाहक वाहिन्यांची पाहणी केली. यावेळी रेल्वे सुरक्षा जवान,लोहमार्ग पोलीस, विशेष कमांडो उपस्थित होते.
कल्याणहून थेट मुंबईत शेवटचा थांबा असलेली एक्सप्रेस डोंबिवली स्थानकात थांबल्याने प्रवासी बुचकळ्यात पडले. २५ मिनिटे संबंधित डब्याची आतून, बाहेरून, तांत्रिक पाहणी केल्यानंतर सर्व सुस्थितीत असल्याची खात्री झाल्यानंतर बनारस एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने निघाली. दुपारच्या वेळेत मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकलचे प्रमाण कमी असते. त्यामुळे २५ मिनिटे डोंबिवली स्थानकात एक्सप्रेसचा खोळंबा होऊनही लोकल वाहतुकीवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही, असे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. जलद लोकलने मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांनी या संधीचा फायदा घेत बनारस एक्सप्रेसने मुंबईचा जलदगती प्रवास केला.