ठाणे महापालिकेमार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणारा बालनाटय़ महोत्सवात यंदा पहिल्यांदाच उत्कृष्ट नाटकांना पुरस्कार देण्यात येणार आहे. ठरावीक नाटय़संस्था आणि नाटकांपुरते मर्यादित राहिलेला हा महोत्सव यंदा शहराच्या विविध भागांमधील नाटय़संस्था आणि प्रयोगशील कलावंतांपर्यंत नेण्याचा प्रयत्न महापालिकेने केला आहे. त्यामुळे यंदा प्रथमच ‘उपेक्षितांचे अंतरंग’ या महोत्सवात उमटणार आहेत. ठाण्याचे महापौर संजय मोरे यांच्या संकल्पनेतून यंदाच्या महोत्सवात वंचितांचे विश्व रंगमंचावर साकारण्याची संधी अनेकांना मिळणार आहे.
या महोत्सवात प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या संस्थेस पाच हजार रुपये, व्दितीय क्रमांकास तीन हजार तर तृतीय क्रमांकास दोन हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. एक उत्तेजनार्थ नाटकासाठी रु. १ हजार असे पुरस्काराचे स्वरूप ठरविण्यात आले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या पुढाकाराने दरवर्षी नाताळच्या सुट्टीत बालनाटय़ महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी २५ ते २७ डिसेंबरदरम्यान हा महोत्सव भरणार असून यंदाच्या महोत्सवाचे स्वरूप अधिक सर्वकक्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या महोत्सवामध्ये २५ डिसेंबर रोजी प्रवीणकुमार भारदे लिखित व दिग्दर्शित व माता अनुसया प्रोडक्शन निर्मित ‘बाल शिवबा’, विशाल कुंटे लिखित, सूर्यकांत कोळी दिग्दर्शित व समता विचार प्रसारक मंडळ, ठाणे निर्मित ‘क्लासची वारी’ तसेच राकेश गायकवाड लिखित व दिग्दर्शित ‘श्रद्धा-अंधश्रद्धा’ ही नाटके सादर करण्यात येणार आहेत. शनिवार दिनांक २६ डिसेंबर रोजी संदीप गचांडे लिखित व दिग्दर्शित व मुक्त छंद निर्मित ‘किलबिल पाखरांची चिलबिल शाळा’ हे नाटक तर त्यानंतर विशाल कुंटे लिखित व सूर्यकांत कोळी दिग्दर्शित ‘मी काय शिकलो’, सुनीता, प्रियंका, राधिका लिखित व शेहेनाज, पंकज दिग्दर्शित ‘जंगल-बिन भिंतीची शाळा’ ही नाटके सादर होणार आहेत. ही दोन्ही नाटके समता प्रसारक मंडळ, ठाणे ही संस्था सादर करणार आहे.
महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी संकेत तटकरे लिखित व दिग्दर्शित व सांज एन्टरटेनमेंट निर्मित ‘खफूआ-खडा फुटणार आहे’ हे नाटक तर त्यानंतर समता विचार प्रसारक मंडळ, ठाणे निर्मित कल्पना म्हात्रे लिखित, अश्विनी मोहिते दिग्दर्शित ‘बाल सुधार गृह’ तसेच अनुजा व अंजली लोहार लिखित व दिग्दर्शित ‘टपाल-एक हरवलेले पत्र’ ही नाटके सादर होणार आहेत. याच दिवशी मुलांना खाऊ व शैक्षणिक साहित्याचे वाटप करून महोत्सवाची सांगता होणार आहे.