ठाणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा १५ आणि १६ मार्च रोजी जाणार असून या यात्रेदरम्यान राहुल गांधी हे ठाणे शहरात सभा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या या सभेत राहुल गांधी काय भाष्य करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळून सत्तेवर आलेल्या महायुतीच्या सरकारच्या काळात ठाणे जिल्ह्याचे महत्व वाढले आहे. हा जिल्हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि काँग्रेस या महायुतीच्या नेत्यांकडून जिल्ह्यावर लक्ष्य केंद्रीत केले असून त्यापाठोपाठ आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आता जिल्ह्यातील भिवंडी आणि ठाणे शहरातून जाणार आहे.

हेही वाचा…ठाणे हाऊसिंग अदालतीत तक्रारदारांना दिलासा, प्रलंबित १२० पैकी ११० तक्रारींवर निर्णय

राहुल गांधी यांनी संपूर्ण देशात भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. पहिल्या टप्यातील या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी आता दुसऱ्या टप्यात ही यात्रा पुन्हा सुरु केली आहे. या यात्रेचे नियोजन आणि कार्यक्रमांची आखणी करण्यासंदर्भात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी ठाणे काँग्रेस मुख्यालयात बैठक घेऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना महत्वाच्या सुचना केल्या. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून यात्रेबाबत माहिती दिली.

ही यात्रा १२ मार्चला गुजरातमधून राज्यातील नंदुरबार जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. त्यानंतर धुळे, मालेगाव, नाशिक मार्गे ती १५ मार्चला वाडा, भिवंडी येथे येणार आहे. या दिवशी ते भिवंडीत थांबणार आहेत. १६ मार्चला ही यात्रा ठाणे शहरात येणार आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांची सभा होणार आहे. यानंतर हि यात्रा मुलूंड येथे थांबेल आणि १७ मार्चला दादर चैत्यभूमी येथे यात्रेचा समारोप होईल. याचदिवशी ते मुंबईतील महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.

हेही वाचा…डोंबिवली : शिळफाटा रस्ता रविवारी अवजड वाहनांसाठी बंद, शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी वाहतूक विभागाचा निर्णय

भिवंडी येथून मुंबई-नाशिक महामार्गे भारत जोडो न्याय यात्रा खारेगाव मार्गे मुंब्रा-कौसा, कळवा, कोर्टनाका, जांभळीनाका, राम मारुती रोड, गोखले रोड, तीन हात नाका येथून मुलूंडला जाईल. जांभळी नाका येथे राहुल गांधी हे यात्रेच्या वाहनांवरूनच सभा घेऊन उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.