उत्तन, ठाणे मार्गावरील बससेवा वाढणार
केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेतून मीरा-भाईंदरसाठी मंजूर झालेल्या ९० बसेसपैकी आणखी नव्या १५ बसेस परिवहन सेवेत दाखल झाल्या आहेत. बसेसचा विमा व नोंदणी प्रक्रिया पार पाडून लवकरच त्या रस्त्यावर धावू लागणार आहेत. याआधी योजनेतून २८ बसेस महापालिकेला मिळाल्या असून त्या सध्या विविध मार्गावर धावत आहेत.
केस्ट्रेल इन्फास्ट्रक्चर या कंत्राटदाराच्या ताब्यात परिवहन सेवा असताना त्यांची अवस्था खिळखिळी झाली होती. पत्रे फाटलेले, आसने तुटलेली अशा अवस्थेत असलेल्या बसेसमधून प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करायचे. यासाठी महानगरपालिकेने केंद्र सरकारच्या
जेएनएनआरयूएम योजनेतून बसेसची मागणी केली. ९० बसेस योजनेतून मंजूर झाल्या. यापैकी २५ बसेस गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मिळाल्या होत्या. खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्याचे लोकार्पण केले होते. मात्र या बसेस पुरेशा नसल्याने सुरुवातीला सर्वाधिक गरज असलेल्या उत्तन या मार्गावर बसेस उतरविण्यात आल्या. त्यानंतर आता २८ बसेस विविध बारा मार्गावर धावत आहेत. यात ठाण्याचाही समावेश आहे. आता आणखी पंधरा बसेस आल्या असल्याने सध्या मीरा रोडच्या ज्या भागात बससेवा नाही, अशा ठिकाणी बससेवा सुरू करण्यात येणार आहे तसेच उत्तन व ठाणे या मार्गावरही बसेस वाढविण्यात येतील, अशी माहिती परिवहन सेवेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे- वडे यांनी दिली.

वातानुकूलित वोल्व्हो बसची प्रतीक्षा
मंजूर झालेल्या नव्वद बसेसमध्ये पाच वातानुकूलित वोल्व्हो बसेसचाही समावेश आहे. मात्र या बसेस शहरात न चालविता बाहेरच्या मार्गावर धावणार आहेत. या बसेस चालविण्यासाठी त्याच्या तिकीट दरांना रस्ते वाहतूक प्राधिकरणाची मान्यता आवश्यक आहे. महापालिकेने दरनिश्चितीचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे पाठवला आहे; परंतु अद्याप त्याला मान्यता मिळाली नसल्याने वोल्व्हो बस ताफ्यात दाखल झालेल्या नाहीत. तिकीट दराला मान्यता मिळताच वातानुकूलित वोल्व्हो बससेवेचा लाभही प्रवाशांना मिळणार आहे.