कल्याण : भीमाशंकर डोंगर परिसरातील प्रस्तावित टोरेंटो पॉवर कंपनीच्या प्रकल्पासाठी हजारो झाडांची कत्तल शासनाकडून करण्यात येत आहे. पर्यावरणाचा हा ऱ्हास रोखण्यासाठी निसर्ग, किल्ले संवर्धनात काम करणाऱ्या शंभुदुर्ग संघटनेच्यावतीने भीमाशंकर डोंगराच्या पायथ्याशी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र शासन व टोरेंटो पॉवर कंपनीविरोधात सोमवारी आंदोलन करण्यात आले. या आंदोलना दरम्यान ‘वृक्षतोड थांबवा, सह्याद्री वाचवा’, ‘सह्याद्री आमचा वारसा आहे, त्याचे रक्षण करणे आमचे कर्तव्य आहे’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
ठाणे जिल्ह्यातील शंभुदुर्ग संघटनेचे शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. सोमवारी सकाळीच ठाणे जिल्ह्याच्या विविध भागातून शंभुदुर्ग संघटनेचे कार्यकर्ते भीमाशंकर डोंगराच्या पायथ्याशी जमा झाले.
या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष आदेश चौधरी, सचिव संजय चौधरी, संघटक संजय पाटील, संपर्क प्रमुख संजय लोंढे, जिल्हाध्यक्ष सागर मोरे, क़र्ज़त जिल्हाध्यक्ष विनोद भोईर, मिनीश मसाने, तालुका अध्यक्ष अमोल दळवी यांच्यासह संघटनेचे विविध पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेल्वे, एसटी बस, खासगी वाहनांनी कार्यकर्दे आंदोलनस्थळी आले होते.
यावेळी संघटनेच्यावतीने महाराष्ट्र शासनाला आवाहन करण्यात आले की, भीमाशंकर डोंगरासारख्या निसर्गसंपन्न आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण परिसरात प्रस्तावित असलेला टोरेंटो पॉवर कंपनीचा प्रकल्प तातडीने रद्द करण्यात यावा. विकासाला संघटनेचा विरोध नसून, निसर्गाची हानी होणार नाही अशा पर्यायी ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात यावा. अशी संघटनेची भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आली.
जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही, तोपर्यंत शंभुदुर्ग संघटना या प्रकल्पा विरोधातील आंदोलनात पूर्ण ताकदीने सक्रिय राहील आणि सह्याद्रीच्या रक्षणासाठी शासना विरोधात लोकशाही मार्गाने संघर्ष सुरूच ठेवेल, असा ठाम निर्धार यावेळी संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला. सह्याद्रीचे नैसर्गिक सौंदर्य, पर्यावरण आणि येणाऱ्या पिढ्यांचा वारसा जपण्यासाठी शंभुदुर्ग संघटना कटिबद्ध असल्याचा संदेश या आंदोलनातून देण्यात आला.
भीमाशंकर डोंगर हा जैवविविधतेने संपन्न आहे. विविध प्रकारचे प्राणी, पक्षी यांचा अधिवास या डोंगरात आहे. विविध प्रकारची निसर्ग संपन्नतेने हा डोंगर भरलेला आहे. वनस्पती शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना हा डोंगर, तेथील जैवविविधता म्हणजे एक संदर्भ ग्रंथ आहे. त्यामुळे हा चालताबोलता जैवविविधतेने भरलेले डोंगर एका विद्युत प्रकल्पासाठी नष्ट करू नये.-आदेश चौधरी, अध्यक्ष, शंभुदुर्ग संघटना.
