ठाणे : कामावरुन काढल्याचा राग मनात धरुन एका तरुणाने मालकाच्या कुटुंबियांवर त्यांच्या घरी जाऊन चाकूने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत दीड वर्षांची मुलीलाल देखील त्या कामगाराने मारहाण केली. प्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनोद अग्रवाल यांचा भिवंडीत धागा निर्मितीचा कारखाना असून त्यामध्ये जितेंद्रकुमार गौतम हा कामगार म्हणून कार्यरत होता. चार ते पाच दिवसांपूर्वी त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. त्याचा राग मनात धरून जितेंद्र याने रविवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास मानसरोवर येथील विनोद अग्रवाल यांच्या घरी पोहोचला. त्यावेळी घरात विनोद अग्रवाल हे उपस्थित नव्हते. परंतु त्यांच्या पत्नी, आई आणि दीड वर्षांची मुलगी उपस्थित होत्या.

जितेंद्रकुमार हा घरामध्ये शिरल्यानंतर त्याने विनोद यांची विचारणा केली. विनोद अग्रवाल घरी नसल्याचे सांगितल्यानंतर जितेंद्रकुमार संतापला. त्याने जवळील चाकू काढून त्यांच्या पत्नीवर हल्ला केला. प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना ढकलून दिल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यानंतर चाकूने दोन्ही हातांच्या बोटांवर, डाव्या हाताच्या कोपरावर तसेच कानाजवळ वार करून जखमी केले. यावेळी मदतीसाठी आलेल्या विनोद यांच्या आई यांनाही त्याने ढकलून देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घरातील दीड वर्षांच्या मुलीला देखील मारून ढकलल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तिघांच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. त्यांनी जितेंद्रकुमार यास पकडून ठेवले. दरम्यान, माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १३५, ३७ (१), ३७ (३) आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ चे कलम ११५ (२), ११८ (२), ३३३, ३५१ (३), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.