ठाणे : गावी पैसे पाठविण्यासाठी एटीएम केंद्राजवळ गेलेल्या मजुरासह दोघांची ऑनलाईन पैसे पाठविण्याच्या बहाण्याने फसवणूक करण्यात आली. एकाकडून १० हजार आणि दुसऱ्या मजूराकडून १२ हजार रुपये भामट्यांनी स्वत:च्या खात्यात घेतले. याप्रकरणी भिवंडीतील निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
भिवंडी येथील म्हाडा काॅलनी भागात तक्रारदार युसूफ खान हे राहतात. ते बांधकाम मिस्त्री म्हणून मिळेल तेथे काम करतात. सोमवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास कामाहून घरी जात होते. त्यावेळी त्यांच्या परिचयाचा इम्रान खान आणि मोहम्मद बशीर आलम अन्सारी हे भेटले. मोहम्मद बशीर हा परिसरातील एटीएम केंद्रात पैसे भरण्यासाठी जात होता. युसूफ यांनाही गावी पैसे पाठवायचे होते. त्यामुळे ते तिघेही एटीएम केंद्राच्या दिशेने निघाले. तिघेहीजण मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास एटीएम केंद्राजवळ पोहचले असताना तीनजण त्यांच्याजवळ दुचाकीने आले. त्यांनी इम्रान यांच्याकडे १० हजार रोकडची मागणी करुन त्यांना ऑनलाईनरित्या १० हजार रुपये पाठवितो असे सांगितले.
इम्रान यांनी त्या व्यक्तीला १० हजार रुपयांची रोकड दिली. तसेच त्यांच्या मोबाईलमधील स्कॅनरद्वारे १० हजार रुपये त्या व्यक्तीस पाठविण्यास सांगितले. त्याचवेळी दुसऱ्या एका व्यक्तीने युसूफ यांनाही त्यांच्याकडे रोकड असल्यास देण्यास सांगितले. युसूफ यांनी त्यांच्याकडील १२ हजार रुपयांची रोकड त्यांना दिली. तसेच मोबाईल स्कॅनरद्वारे पैसे पाठविण्यास सांगितले. परंतु त्यांच्या खात्यात पैसे आलेच नाहीत. याबाबत त्यांनी जाब विचारला असता, त्याचवेळी तिघेही दुचाकीवरून पळून गेले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी निजामपूरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल झाला आहे.
