Bhivandi Balasaheb Thackeray flyover traffic update: भिवंडी शहरातील दिवंगत बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याने या कामासाठी उड्डाणपुलावरील वाहतूक दुरुस्ती कामाच्या कालावधीत पूर्णत: बंद केली जाणार आहे. त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी या मार्गावर वाहतूक बदल लागू केले आहेत. हे वाहतूक बदल दररोज रात्री ११ ते सकाळी ६ या कालावधीत शुक्रवार पर्यंत कायम राहतील.
भिवंडी शहरातील वाहतुकीसाठी दिवंगत बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा आहे. या उड्डाणपुलावरून हजारो वाहने वाहतूक करतात. या पूलाची दुरुस्ती मंगळवारपासून सुरु झाल्याने ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतूक बदल लागू केले आहेत. या वाहतूक बदलानुसार, रात्री आणि सकाळच्या वेळेत उड्डाणपुलावरून वाहतूक पूर्णत: बंद असेल.
नारपोली, मानकोली, अंजुरफाटा, नदीनाका, चाविंद्रा, बाग-ए-फिरदोस, वंजारपट्टीनाका येथून कल्याणनाकाच्या दिशेने वाहतूक करण्यासाठी दिवंगत बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर वाहतूक करणाऱ्या वाहनांना दांडेकरवाडी येथील मंगलमुर्ती सभागृहाजवळ उड्डाणपुलाच्या चढणीवर प्रवेशबंदी आहे. येथील वाहने उड्डाणपुलाखालून बिबी चौक, के.बी. चौक, भादवड मार्गे वाहतूक करतील. कल्याण, रांजनोली मार्गे भिवंडी शहर, अंजुरफाटा, नदीनाका, वाडा येथे वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना साईबाबा मंदीर येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने पुलाखालून वाहतूक करतील.
