लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल फेरतपासणी मोहिमेअंतर्गत (एसआयआर) मतदार नोंदणीचे काम करताना हलगर्जी, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अरेरावीची भाषा केल्याप्रकरणी प्राध्यापकाविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महसूल खात्याचे नायब तहसीलदार यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
१३४-भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील विशेष सखोल फेरतपासणी मोहिमेसाठी काल्हेर येथील महाविद्यालयातील प्राध्यापकाची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना आदेश देऊनही त्यांनी अपेक्षित गतीने काम केले नाही. त्यांच्याकडून मतदारांना गणनापत्र वाटप केवळ १६ टक्के, तर त्याचे डिजिटायझेशन अवघे ४ टक्केच करण्यात आले. त्यामुळे संबंधित यादी भागाचे काम मुदतीत पूर्ण होणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्याकडून काम काढून घेऊन दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे सोपविण्यात आले.
तसेच, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोबाइलद्वारे संपर्क साधल्यास प्रतिसाद न देणे, कामाचा आढावा देण्यास नकार देणे, नागरिकांकडे भेटी न देणे व प्रत्यक्ष भेटीत अधिकाऱ्यांशी अरेरावीची भाषा वापरत त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या वर्तनामुळे निवडणूक आयोगाच्या विशेष पुनरिक्षण मोहिमेवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
