ठाणे : वैद्यकीय कागदपत्रे नसतानाही एका डाॅक्टरने भिवंडीत वैद्यकीय व्यवसाय थाटला होता. भिवंडी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करुन संबंधित डाॅक्टरविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार डाॅक्टरविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

भिवंडीत यापूर्वी मोठ्याप्रमाणात बोगस डाॅक्टर आढळून आले होते. त्यांच्याविरोधात महापालिकेकडून कारवाई झाली होती. दरम्यान, शहरातील बोगस डाॅक्टरांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना महापालिकेच्या आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी डाॅ. जयवंत धुळे यांनी दिल्या होत्या.

त्यानुसार, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी भिवंडीतील कामतघर भागात गेले असता, येथील एका गाळ्यामध्ये एक डाॅक्टर वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे आढळले. आरोग्य विभागाच्या पथकाने त्याच्याकडून सनदशीर कागदपत्रांची मागणी केली. परंतु तो डाॅक्टर कागदपत्र दाखविण्यास असमर्थ ठरला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संबंधित डाॅक्टर अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करत असल्याने पथकाने त्याच्याविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे डाॅक्टरविरोधात वैदयकीय व्यवसायी अधिनियम १९६१ चे कलम ३३ आणि ३६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.