ठाणे : भिवंडी येथील म्हाडा काॅलनी भागात कचरा टाकण्यासाठी गेलेल्या १० वर्षाच्या मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाला. शनिवारपासून तो बेपत्ता होता. रविवारी सकाळी त्याचा मृतदेह नदीकिनारी आढळून आला. याप्रकरणाची नोंद निजामपूरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
म्हाडा काॅलनी येथे मोहम्मद आतिफ मोहम्मद इरफान शेख हा त्याच्या कुटुंबासह वास्तव्यास होता. शनिवारी तो कचरा टाकण्यासाठी नदीनाका येथे गेला होता.त्याच दिवशी परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती. शनिवारी सायंकाळपर्यंत मोहम्मद आतिफ मोहम्मद इरफान शेख हा घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतल्यानंतर निजामपूरा पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. रविवारी सकाळी नदी नाका किनारी भागात मोहम्मद आतिफ मोहम्मद इरफान शेख हा बेशुद्ध अवस्थेत आढळला. नागरिकांनी त्याला तात्काळ सरकारी रुग्णालयात दाखल केले. परंतु त्याचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदन अहवालात त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणाची नोंद निजामपूरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
