ठाणे : भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेने धोकादायक घोषित केलेल्या कोहिनूर इमारतीचा काही भाग कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. या घटनेची गंभीर दखल घेत मदतकार्याला गती देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत केली जाईल, तसेच जखमींवर सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
भिवंडीतील नारपोली येथील बालाजी नगर, गंगाराम वाडी परिसरातील कोहिनूर इमारत भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेने यापूर्वीच धोकादायक घोषित केली होती. मात्र, इमारतीच्या डागडुजीचे काम सुरू असतानाच तिचा ‘बी’ विंग कोसळून ही भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून स्थितीचा आढावा घेतला. बचावकार्य अधिक वेगाने आणि प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
सध्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), भिवंडी महापालिकेचे अग्निशमन दल व श्वानपथकाच्या साह्याने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध सुरू आहे. बचाव कार्यात कोणतीही कसूर होऊ नये, यासाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्री उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.
दुर्घटनेतील जखमींवर भिवंडीतील आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू असून, गरज भासल्यास त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. जखमी नागरिक लवकर बरे व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दुर्घटनाग्रस्त इमारतीतील रहिवाशांचे तात्पुरते सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले असून त्यांच्या निवासाची आवश्यक व्यवस्था करण्याबाबतही प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत.
भिवंडीतील नारपोली येथील बालाजी नगर, गंगाराम वाडी मधील कोहिनूर इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्देवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 31, 2026
ही इमारत भिवंडी निजामपूर महानगरपालिकेने धोकादायक घोषित केली होती. मात्र…
तसेच मृतांच्या कुटुंबीयांना शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत दिली जाईल, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. दरम्यान, धोकादायक घोषित करण्यात आलेल्या इमारतीत ही दुर्घटना घडल्याने अशा इमारतींच्या सुरक्षेचा आणि त्यावरील कारवाईच्या अंमलबजावणीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
