ठाणे : भिवंडीतील गंगारामवाडी येथील कोहिनूर अपार्टमेंट दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू आणि तिघे जखमी झाल्याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी इमारत मालक आणि दुरुस्ती कंत्राटदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. हे दोघेही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
भिवंडी येथील गंगारामवाडी येथील कोहिनूर अपार्टमेंट दुर्घटनेप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी इमारत मालक बिलाल अहमद अब्दुलकर खान आणि दुरुस्ती कंत्राटदार अशोक यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. भिवंडी निजामपुर महापालिका अनधिकृत बांधकाम निष्कासन विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त जितेंद्र अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. कोहिनूर अपार्टमेंटची ”बी” विंग कोणतीही वैध परवानगीविनाच अनधिकृतपणे बांधण्यात आली होती.
निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे अवघ्या १३ वर्षांत ही इमारत धोकादायक बनून मोडकळीस आली होती. महापालिकेने धोकादायक इमारतीबाबत वारंवार नोटिसा बजावूनही इमारत मालक बिलाल खान यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. इमारत कोसळण्याचा धोका असल्याची पूर्ण कल्पना असतानाही रहिवाशांना इमारत रिकामी करण्यास सांगितले नाही, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच, दुरुस्ती ठेकेदार अशोक याने कोणतीही आवश्यक परवानगीविनाच निष्काळजीपणे दुरुस्तीची कामे सुरू केली. दुरुस्तीदरम्यान इमारतीच्या खांबांना हानी पोहोचल्याने इमारत कोसळली आणि त्यात १० जणांचा मृत्यू, तर तीन जण जखमी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
भिवंडीतील १०७४ धोकादायक इमारतींवर कारवाई
गंगारामवाडी येथील इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भिवंडी-निजामपूर महापालिकेचे महापौर नारायण रतन चौधरी यांनी आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेत शहरातील २३८ अतिधोकादायक (सी-१) आणि ८३६ धोकादायक (सी-२ए) अशा एकूण १,०७४ इमारती तातडीने रिकाम्या करून त्यांचा वीज आणि नळपाणी पुरवठा खंडित करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना बैठकीत दिले. धोकादायक इमारतीतील रहिवाशांना महापालिकेच्या इमारतींमध्ये पाच ते सहा दिवसांसाठी तात्पुरते स्थलांतरित करण्यात यावे.
तसेच धोकादायक इमारतींमध्ये विनापरवानगी दुरुस्ती सुरू नाही ना, यासाठी दिवस-रात्र प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. आवश्यकतेनुसार जेसीबी, डम्पर उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रभाग अधिकाऱ्यांसाठी नवीन बोलेरो जीप, आरोग्य विभागासाठी रुग्णवाहिका आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध करण्याचे प्रस्तावही सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या बैठकीला उपायुक्त (अनधिकृत बांधकाम) विक्रम दराडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी संदीप गाडेकर आणि सहायक आयुक्त यांच्यासह सर्व प्रभागांचे अधिकारी उपस्थित होते.
