ठाणे : भिवंडीतील नारपोली परिसरातील कोहीनूर इमारत दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भिवंडीतील धोकादायक इमारती, वाढते अतिक्रमण व नगररचना व्यवस्थेवर गंभीर चिंता व्यक्त केली.
भिवंडीतील अतिक्रमणांचे प्रमाण सर्वाधिक नगरविकास विभागाने या प्रश्नाकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही या विषयात विशेष लक्ष घालावे असे स्पष्ट वक्तव्य महाजन यांनी केले. भिवंडीतील मौजे नारपोली येथील बालाजी नगर, गंगाराम वाडी परिसरातील कोहीनूर या तळमजला अधिक चार मजली इमारतीचा ‘बी’ विंग गुरुवारी रात्री कोसळला. दुर्घटनेत नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दुर्घटनास्थळी पोहोचल्यानंतर गिरीश महाजन यांनी सर्वप्रथम सुरू असलेल्या बचावकार्याची माहिती घेतली. एनडीआरएफ, अग्निशमन दल व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध शक्य तितक्या जलद व सुरक्षित पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. बचावकार्यात कोणतीही अडचण येऊ नये तसेच आवश्यक यंत्रसामग्री, मनुष्यबळ व वैद्यकीय सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.
माध्यमांशी बोलताना महाजन यांनी सांगितले की, संबंधित कोहीनूर इमारतीला यापूर्वी दोन वेळा धोकादायक असल्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. इमारत रिकामी करण्याबाबत प्रशासनाने सूचना दिल्या होत्या. मात्र, सर्व रहिवाशांनी इमारत पूर्णपणे रिकामी केली नव्हती. काहीजण इमारतीत वास्तव्यास होते, तर काही ठिकाणी दुरुस्तीचे कामही सुरू होते. अशा स्थितीत ही दुर्घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.
दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त करत शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असे महाजन यांनी स्पष्ट केले. मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून आर्थिक मदत दिली जाईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. यावेळी त्यांनी विशेषतः भिवंडीतील वाढत्या अतिक्रमणांवर बोट ठेवले. शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली असून त्यामुळे रस्ते, इमारती, आपत्कालीन सेवा आणि नागरिकांच्या सुरक्षेवर गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
अशा अतिक्रमणांमुळे बचावकार्यालाही अनेकदा अडथळे निर्माण होतात. त्यामुळे केवळ दुर्घटनेनंतर कारवाई करून चालणार नाही, तर अशा धोकादायक परिस्थितीला आधीच प्रतिबंध घालण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भिवंडीमध्ये अतिक्रमणाचे प्रमाण अत्यंत मोठे आहे. नगरविकास विभागाने याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. मला वाटते उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रश्नात विशेष लक्ष घालण्याची आवश्यकता आहे,असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
यासोबतच त्यांनी राज्यातील विविध शहरांमध्येही अतिक्रमणांचा प्रश्न गंभीर असल्याचे मान्य केले. सरकार या विषयावर सातत्याने काम करत आहे. दुर्घटनाग्रस्त कोहीनूर इमारतीला लागून असलेल्या इमारतीलाही संभाव्य धोका असल्याचे प्राथमिक पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे त्या इमारतीतील रहिवाशांना तातडीने बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. परिसरातील अन्य धोकादायक इमारतींचीही तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या दुर्घटनेने पुन्हा एकदा धोकादायक इमारती, अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणाचा मुद्दा चर्चेत आला आहे.
