ठाणे : भिवंडी येथील नारपोली भागात इमारत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतील मृतांमधील शमीम शेख (वय२२) याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. बालाजीनगर परिसरातील गंगाराम वाडी येथील कोहीनूर इमारतीच्या ‘बी’ विंगचा काही भाग गुरुवारी रात्री कोसळला. त्याखाली काहीजण गाडले गेल्याचे सांगण्यात आले. त्यांचा शोध बचाव पथकाने सुरू आहे. कोहिनूर ही तळ अधिक चार मजली इमारत आहे. या इमारतीला भिवंडी-निजामपूर महापालिकेने याआधीच धोकादायक घोषित केले होते. मात्र, इमारतीची दुरुस्ती सुरू असताना गुरुवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास इमारतीचा काही भाग अचानक कोसळला.

या इमारतीत एकूण ४८ खोल्या असून प्रत्येक मजल्यावर १२ खोल्या आहेत. रात्री आठ ते नऊच्या सुमारास इमारतीतून आवाज ऐकू येऊ लागल्याने स्थानिक नागरिकांनी काही कुटुंबांना तातडीने बाहेर काढले. मात्र, काही रहिवासी व कामगार बाहेर पडत असतानाच इमारतीचा भाग कोसळल्याने ते ढिगाऱ्याखाली अडकले.

घटनास्थळी अग्निशमन दल, भोईवाडा पोलीस, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी, तसेच स्थानिक नागरिक तातडीने दाखल झाले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), भिवंडी अग्निशमन दल व श्वानपथकाच्या साह्याने बचावकार्य सुरू असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे.

घटनास्थळी दोन रुग्णवाहिका व एक जेसीबी तैनात आहे. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला. तर दोघांना ढिगाऱ्यातून सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याचे प्राथमिक माहितीत सांगण्यात आले. प्रशासनाच्या वतीने बचाव व मदतकार्य मध्यरात्री व दिवसाही सुरू होते. शमीम शेख वगळता इतरांची माहिती अद्याप कळू शकली नाही. दुर्घटनेतील जखमी आणि मृतांची अधिकृत माहिती बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.