ठाणे : भिवंडी येथील नारपोली भागात इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कोहीनूर इमारतीच्या ‘बी’ विंगचा काही भाग गुरुवारी रात्री कोसळल्याने या दुर्घटनेत काहीजण ढिगाऱ्याखाली अडकले असून त्यांचा शोध बचावर पथकाकडून सुरु आहे. या घटनेत सहाव्या मृतदेहाची ओळख पटली असून त्याचे नाव शमीम शेख (३२) असल्याची माहिती प्रशासनाने दिली.नारपोली येथील बालाजीनगर परिसरातील गंगाराम वाडी येथे कोहीनूर ही तळ अधिक चार मजली इमारत आहे.

या इमारतीला भिवंडी-निजामपूर महापालिकेने यापूर्वीच धोकादायक घोषित केली होती. मात्र, इमारतीची दुरुस्ती सुरू असतानाच गुरुवारी रात्री ११ ते ११.३० वाजण्याच्या सुमारास ‘बी’ विंगचा काही भाग अचानक कोसळला. या इमारतीत एकूण ४८ खोल्या असून प्रत्येक मजल्यावर १२ खोल्या आहेत. रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान इमारतीतून आवाज ज येऊ लागल्याने स्थानिक नागरिकांनी काही कुटुंबांना तातडीने बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविले. मात्र, काही रहिवासी व कामगार बाहेर पडत असतानाच इमारतीचा भाग कोसळल्याने ते ढिगाऱ्याखाली अडकले.

घटनास्थळी अग्निशमन दल, भोईवाडा पोलीस, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी, तसेच स्थानिक नागरिक तातडीने दाखल झाले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), भिवंडी अग्निशमन दल आणि श्वानपथकाच्या सहाय्याने बचावकार्य सुरू असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे. घटनास्थळी दोन रुग्णवाहिका आणि एक जेसीबी तैनात करण्यात आला आहे.

या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून दोघांना ढिगाऱ्यातून सुरक्षित बाहेर काढल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. प्रशासनाच्या वतीने बचाव आणि मदतकार्य मध्यरात्री आणि दिवसा देखील सुरू होते. शमीम शेख वगळता इतरांची माहिती अद्याप कळू शकली नाही. दुर्घटनेतील जखमी आणि मृतांची अधिकृत माहिती बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.