ठाणे : भिवंडीतील नारपोली परिसरातील कोहिनूर इमारत कोसळून नऊ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी कोणतीही दिरंगाई न करता युद्धपातळीवर बचावकार्य राबवावे, अशी सूचना कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. निरंजन डावखरे यांनी प्रशासनाला दिल्या.
भिवंडीतील नारपोली परिसरातील बालाजीनगर, गंगारामवाडी येथील कोहिनूर इमारत कोसळून नऊ नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेने शहरात शोककळा पसरली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पदवीधर आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशासनाला विविध सूचना दिल्या. तसेच जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याशी चर्चा करून त्यांनी मदत व बचावकार्याचा आढावा घेतला.
यावेळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक, भिवंडी-निजामपूर महापालिकेचे अग्निशमन दल, श्वान पथक आणि स्थानिक प्रशासनाकडून सुरू असलेल्या बचाव मोहिमेची माहिती दिली. यानंतर आमदार डावखरे यांनी भिवंडीतील एमजीएम रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या जखमींची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधवी पांढरे यांच्याशी चर्चा करून जखमींना दिल्या जाणाऱ्या उपचारांची माहिती घेतली. उपचारात कोणतीही कमतरता राहू नये आणि आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी सहकार्य
दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत, मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असून शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. जखमींना सर्वतोपरी मदत मिळावी तसेच मृतांच्या कुटुंबीयांना शासनाच्या सर्व मदत योजनांचा तातडीने लाभ मिळावा, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे. या घटनेमुळे जीर्ण इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा अधोरेखित झाला आहे. भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी धोकादायक इमारतींची नियमित तपासणी, वेळेत स्ट्रक्चरल ऑडिट आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
