ठाणे : ‘कट्… कट्… कडाड… असा काहीतरी तुटण्याचा आवाज झाला. इमारतीचा काही भाग तुटत असल्याचे जाणवले. भीतीपोटी दहा वर्षांच्या मुलीला घेऊन घराबाहेर पडलो आणि काही क्षणांतच इमारत पत्त्यासारखी कोसळली…,’ असा अंगावर काटा आणणारा अनुभव भिवंडी दुर्घटनेतून बचावलेल्या मनोज प्रजापती यांनी कथन केला. या दुर्घटनेत त्यांची पत्नी संगीता जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भिवंडीतील नारपोली भागातील गंगारामवाडी परिसरातील कोहिनूर इमारतीत मनोज प्रजापती हे पत्नी संगीता व दहा व बारा वर्षांच्या दोन मुलींसोबत राहत होते. प्रजापती दाम्पत्य परिसरातील विविध इमारतींत घरकाम करीत असून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

तीन ते चार महिन्यांपासून ते कोहिनूर इमारतीच्या तळमजल्यावरील एका सदनिकेत दरमहा तीन हजार रुपये भाडे तत्त्वावर राहत होते. गुरुवारी रात्री मनोज व संगीता कामावरून घरी परतले. दहा वर्षांची मुलगी त्यांच्यासोबत घरात होती. तर संगिता घराबाहेर इमारतीची झालेली दुरवस्था व त्याबाबतच्या धोक्याविषयी इतर रहिवाशांसोबत चर्चा करीत होत्या. दरम्यान, मनोज हे अंघोळीसाठी स्वच्छतागृहात जात असतानाच त्यांना अचानक काहीतरी तुटल्याचा आवाज आला. तो ऐकताच मनोज घाबरले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता दहा वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन घराबाहेर धाव घेतली. त्यासरशी इमारतीचा भाग मोठ्या आवाजासह कोसळला. त्यामुळे मनोज आणि त्यांची मुलगी बचावले. मात्र, या दुर्घटनेत घराबाहेर उभ्या असलेली त्यांची पत्नी जखमी झाली. या दुर्घटनेनंतर संगीता यांनी जखमी अवस्थेत मनोज व मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. मनोज आणि त्यांची मुलगी ढिगाऱ्याखाली अडकले असावेत, अशी भीती त्यांना वाटत होती. मात्र, सर्व जण सुखरूप असल्याचे समजताच, त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला