ठाणे -भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कायदेशीर तरतुदींचे पालन न करणाऱ्या २४ उमेदवारांवर कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी कठोर कारवाई केली आहे. निवडणूक लढविल्यानंतर विहित मुदतीत निवडणूक खर्चाचा अधिकृत हिशोब सादर न केल्यामुळे या २४ उमेदवारांना पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी निवडणूक लढविण्यास तसेच महानगरपालिकेचे सदस्य होण्यास अपात्र घोषित करण्यात आले आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार प्रत्येक उमेदवाराने निवडणूक खर्चाचा संपूर्ण हिशोब विहित कालावधीत तपासणी अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, वारंवार संधी देऊनही संबंधित उमेदवारांनी हा हिशोब सादर न केल्याने त्यांच्याविरुद्ध अखेर कायदेशीर कारवाई करण्यात आली. भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक-२०२६ मध्ये एकूण ४३८ उमेदवार रिंगणात होते. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व उमेदवारांना खर्चाचा तपशील सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, भिवंडी-निजामपूर महापालिकेचे आयुक्त तथा तपासणी अधिकारी यांनी २७ एप्रिल २०२६ रोजी सादर केलेल्या अहवालानुसार २४ उमेदवारांनी निर्धारित मुदतीत खर्चाचा हिशोब सादर केला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संबंधित उमेदवारांना अपात्र ठरविण्याचा प्रस्ताव नमुना-६ अन्वये कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला.

प्रशासकीय प्रक्रियेनुसार न्यायाच्या तत्त्वाचे पालन करत संबंधित उमेदवारांना आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी देण्यात आली होती. यासाठी २५ मे २०२६ आणि २९ जून २०२६ रोजी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात दोन स्वतंत्र सुनावण्या घेण्यात आल्या. मात्र, दोन्ही सुनावण्यांना संबंधित उमेदवार अनुपस्थित राहिले. त्यामुळे त्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे तसेच कायदेशीर तरतुदींचे पालन केले नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात आला. महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील कलम १० (१)(ई) तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या १५ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या आदेशानुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी २ जुलै २०२६ रोजी हा आदेश जारी केला. या अपात्रतेचा कालावधी २ जुलै २०२६ या आदेशाच्या दिनांकापासून पुढील तीन वर्षांपर्यंत लागू राहणार असून, या कालावधीत संबंधित उमेदवारांना कोणतीही महानगरपालिका निवडणूक लढविता येणार नाही किंवा महानगरपालिकेचे सदस्य होता येणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

चौकट या आदेशानुसार कृतिका शरद पाटील, विजया अशोक गायकवाड, शरद पाटील, रेहान मुस्ताक अन्सारी, तेजश्री सागर पाटील, शोएब सलीम शेख, सलीम अन्सारी, जरीना रफीउजमा अन्सारी, तुंबा शकील अन्सारी, रिजवान रहीमुल्लाह खान, रविश हाजी इखलाक खान, इमरान अहमद इस्तेयाक हाशमी, नदीम मोहम्मद मुस्तकिम मोमीन, कमरुन्निसा कासिम अन्सारी, अजीम रहेमान शेख, अनुशा श्रीनिवास वेंगल, विजय पुरुषोत्तम कारमपुरी, रीतीषा महेश घोईल, अस्मिता अरुण तांबे, नितेश वामन गायकवाड, सोहेल जावेद अहमद अन्सारी, मोहसिन जाकीर हुसेन निरबान, आजम मुक्त्तार खान आणि सुशांत भास्कर म्हात्रे या २४ उमेदवारांना अपात्र घोषित करण्यात आले आहे.