ठाणे : सासू आणि आजी सासूच्या जाचाला कंटाळून ३० वर्षाच्या व्यक्तीने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघींविरोधात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
भिवंडी येथील शेलार भागात ३० वर्षीय व्यक्ती त्याच्या पत्नीच्या घरी वास्तव्यास होता. याच गावात तरुणाची आई देखील वास्तव्यास होती. परंतु तरुणाची सासू त्याला त्याच्या आईला भेटण्यास मनाई करत असे. अनेकदा तो त्याच्या आईला मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून त्याची सासू आणि आजी सासू त्याला मारहाण करत असल्याचे सांगायचा.
१३ मार्चला तरुणाला त्याच्या सासू आणि आजी सासूने भर रस्त्यात मारहाण करत त्याची आई राहत असलेल्या घरापर्यंत आणले होते. त्यानंतर तरुणाच्या आईने अटकाव केला असता, त्याला दोघीही पुन्हा त्यांच्या घरी घेऊन गेल्या. १४ मार्चला तरुणाने आईला संपर्क साधून त्याला पुन्हा मारहाण झाल्याचे आणि घराबाहेर काढल्याचे सांगितले. तसेच त्याने विष प्राशन केले असल्याचे म्हणत मोबाईल ठेवून दिला.
तरुणाच्या आईने त्याचा शोध घेतला असता, तो परिसरातील एका टपरी जवळ बसल्याचे आढळून आले. त्यांनी तरुणाला भिवंडी येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्याला पुढील उपचारासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. तरुणाला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेल्यानंतर १५ मार्चला उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सोमवारी, ३० मार्चला तरुणाच्या आईने भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात तरुणाची सासू आणि आजी सासू विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे दोघींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
