ठाणे :भिवंडीत पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करताना कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. सुभाष दिघे (४४) असे मृत कामगाराचे नाव असून या घटनेप्रकरणी भिवंडी महापालिकेतील सफाई विभागातील संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नालेसफाई करण्यासाठी अनेकदा मजुरांना नाल्यात उतरविले जाते. नाल्यात किंवा गटारात उतरल्यानंतर गुदमरून, पडून अनेक मजुरांचा मृत्यू देखील झाला आहे. परंतु त्यांच्या सुरक्षा विषयी कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचे आजही दिसून येत आहे. भिवंडीत देखील असाच काहीसा प्रकार सुभाष दिघे यांच्याबाबतीत घडला आहे.
भिवंडी येथील शेलारगाव भागात सुभाष दिघे हे त्यांच्या मुलासह वास्तव्यास होते. भिवंडी महापालिकेत ते सफाई कामगार म्हणून कंत्राटी काम करत होते. २१ मे या दिवशी शांतीनगर भागातील एका रुग्णालयामागील नाल्यात ते सफाई करण्यासाठी उतरले होते. दिघे यांच्यासोबत एकूण ६ कामगार होते.
त्यावेळी सुभाष यांचा नाल्यात पडून मृत्यू झाला. घटनेची माहिती दिघे यांच्या मुलीला मिळाल्यानंतर तिने इतर कामगारांकडे चौकशी केली. कामगारांना शूज, लाईफ जॅकेट, बुट, दोरी हेल्मेट अशी कोणतीही सुरक्षा साधने देण्यात आली नव्हती तसेच, त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली नसल्याची माहिती तिला मिळाली. अखेर तिने या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे शांतीनगर पोलीस ठाण्यात भिवंडी महापालिकेचे सफाई विभागातील संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराविरोधात भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३ चे कलम १०६ (१), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
