ठाणे : किराणा दुकानातून वस्तू खरेदी करताना आपण नामांकित कंपन्यांवर विश्वास ठेवतो. मात्र, याच विश्वासाला तडा देणारा धक्कादायक प्रकार अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कारवाईतून समोर आला आहे. कालबाह्य, खराब आणि विक्रीस अयोग्य ठरवलेले अन्नपदार्थ नष्ट करण्याऐवजी ते पुन्हा बाजारात विक्रीसाठी पाठवले जात असून एफडीने मागील चार महिन्यात विविध प्रकरणांत लाख रुपयांचा साठा जप्त केला आहे. नियमानुसार, अशा अन्नपदार्थांची विल्हेवाट लावण्यासाठी अधिकृत संस्थेची नियुक्ती करणे आणि संबंधित पदार्थ प्रत्यक्षात नष्ट केल्याचे पुरावे जतन करणे आवश्यक असते.
एका नामांकित कंपनीने कागदोपत्री विल्हेवाट लावणाऱ्या संस्थेची नियुक्ती केली होती; मात्र, प्रत्यक्षात अशी कोणतीही कंपनी उपलब्ध नव्हती. काही प्रकरणांत विल्हेवाटीची जबाबदारी सोपवलेल्या संस्थांच्या मालकांमध्ये काही राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचाही सामावेश असल्याचा संशय एफडीएला आहे. त्यामुळे सखोल तपास झाल्यास मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. भिवंडी शहरात अनेक मोठ्या आणि नामांकित कंपन्यांचे पुरवठा केंद्राची गोदामे आहेत. या पुरवठा केंद्रातून विविध ठिकाणी वस्तू पुरवठा केला जातो.
गोदामांमधून कालबाह्य किंवा विक्रीस अयोग्य अन्नपदार्थ विल्हेवाट लावणाऱ्या संस्थेकडे सोपवले जातात. मात्र, संबंधित पदार्थ प्रत्यक्षात नष्ट झाला की तो अनधिकृत गोदामे, दलाल आणि किरकोळ विक्रेत्यांमार्फत पुन्हा बाजारात पोहोचला, याचा माग काढण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली. भिवंडी आणि मुंब्रा परिसरातील गोदामांमध्ये साठा साठवणे, पाकिटावरील मुदतीत फेरफार करणे किंवा मालाचे पुनर्पॅकिंग केल्याचा प्राथमिक संशय अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. जून महिन्यामध्ये भिवंडी शहरातील आठ आस्थापनांची तपासणी करताना खरेदीची देयके किंवा आवश्यक कागदपत्रे सादर न झाल्याने कालबाह्य साठा जप्त करण्यात आला. भिवंडीतील सरावली येथील ‘ॲमेझाॅन रिटेल इंडिया’च्या पूर्तता केंद्रातही सुमारे दीड टन कालबाह्य आणि खराब अन्नपदार्थ आढळल्याची नोंद आहे.
या साठ्याच्या विल्हेवाटीची जबाबदारी देण्यात आलेल्या संस्थेकडे आवश्यक परवाना किंवा नोंदणी नसल्याचा आणि माल प्रत्यक्ष नष्ट केल्याचा पुरावा उपलब्ध नसल्याचे आढळले होते. जून महिन्यातच भिवंडीत अडवण्यात आलेल्या आंतरराज्यीय ट्रकमध्ये देयकांशिवाय सुमारे ५ लाख १८ हजार रुपयांचे पीठ आणि ब्रँडेड पॅकेटमधील साठा आढळला. हा साठा गुजरातमध्ये पुनर्विक्रीसाठी पाठवला जात असल्याचे चौकशीत समोर आले. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. १४ आणि १५ ऑक्टोबरला ठाणे, पुणे जिल्ह्यांत सात पथकांनी एकाच वेळी कारवाई केली. या टप्प्यात रिलायन्स रिटेल, रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, झोमॅटो हायपरप्युअर आणि ब्लिंकिटशी संबंधित ठिकाणांसह अन्य आस्थापनांमधील साठ्याची तपासणी करण्यात आली. नऊ ठिकाणी नोंदवलेल्या साठ्याचे मूल्य सुमारे ४८ लाख रुपये होते. भिवंडीतील पागाव येथील ब्लिंक कॉमर्सच्या गोदामात २१ ऑक्टोबरला केलेल्या तपासणीत कालबाह्य अन्नपदार्थ असल्याचे आढळून आले. या साठ्याचे मूल्य ३२ लाख ७१ हजार रुपये आहे.
साठा अधिकृत संस्थेकडे सोपवल्यापासून त्याची वाहतूक आणि अंतिम विल्हेवाट होईपर्यंतची अखंड, पडताळता येणारी कागदपत्रांची साखळी उपलब्ध नसल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. या कारवाईत पाच परवानाधारक आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची नोंद आहे. तसेच परवाना नसलेल्या चार ठिकाणांचा व्यवसाय बंद करून साठा जप्त करण्यात आला. या टप्प्यात तीन गुन्हे नोंदवण्यात आले असून, त्यात कंपनीचे अधिकारी, व्यवस्थापक आणि पुरवठादारांसह १७ जणांची नावे असल्याचे अहवालात नमूद आहे. चौकट कालबाह्य वस्तूंचा साठा नष्ट करण्यासाठी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी काही संस्था उघडल्याची प्राथमिक माहिती एफडीएला मिळाली आहे. त्यानुसार एफडीएकडून तपास सुरु आहे. यात राजकीय पदाधिकारी आढळून आल्यास अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
कालबाह्य वस्तूंचा साठा आम्ही जप्त केला असून या प्रकरणांचा तपास सुरु आहे. – तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग.
