ठाणे : भिवंडी येथे बोगस डाॅक्टर विजयप्रताप यादव याच्याविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. यादव याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना वैद्य विशारद उल्लेख करत नागरिकांवर उपचार केल्याचे उघड झाले आहे.

भिवंडी येथील नेहरुनगर भागात बोगस पदवीच्या आधारे विजयप्रताप यादव याने क्लिनिक सुरु केल्याची माहिती भिवंडी महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीनंतर नेहरुनगर परिसरात पथकाने जाऊन कारवाई केली. तसेच विजयप्रताप याला पोलीस ठाण्यात आणले. त्याची चौकशी केली असता, त्याने वैद्य विशारद पदवी असल्याचे म्हटले. परंतु हा प्रकार बनावट असल्याचे पथकाने सांगितले. पथकाने त्याच्या क्लिनिकमधून ३५ वेगवेगळ्या औषधांचा आणि उपकरणाचा साठा जप्त केला. त्याच्याविरोधात भिवंडी महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तक्रार दखल केल्यानंतर शुक्रवारी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.