ठाणे : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने गेल्या काही वर्षात ७८ बोगस डाॅक्टरांविरोधात गुन्हे दाखल केले असतानाच, या विभागाने बुधवारी डॉक्टर्स दिनानिमित्ताने राबविलेल्या विशेष मोहिमेत आणखी एका बोगस डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याच कारवाईत ३३ डॉक्टरांच्या वैद्यकीय शैक्षणिक प्रमाणपत्रांबाबत संशय असल्याने त्यांची चौकशी केली जात आहे.
मुंबई महानगरातील पालिका क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नागरिककरण होत असून या शहरांमध्ये अनेक बोगस डाॅक्टरांनी आपले दवाखाने थाटले आहेत. या डाॅक्टरांकडून नागरिकांच्या जीवीतास धोका असल्याने त्यांच्यावर कारवाईची सातत्याने मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पालिकांकडून शहरात विशेष मोहिम राबवून बोगस डाॅक्टरांचा शोध घेण्यात येतो.
अशाचप्रकारे भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने गेल्या काही वर्षात ७८ बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून त्यापाठोपाठ १ जुलै रोजी ‘डॉक्टर्स दिना’च्या पार्श्वभूमीवर भिवंडी निजामपूर महापालिकेने बोगस डॉक्टरांविरोधात मोहिम राबविली असून, यात ३३ डॉक्टरांच्या वैद्यकीय शैक्षणिक प्रमाणपत्रांबाबत संशय व्यक्त झाल्याने
त्यांचे प्रमाणपत्र तपासण्यात येत आहेत. दरम्यान, गाजेंगी क्लिनिक ॲलोपॅथीची इंजेक्शने आणि औषधसाठा आढळल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आल्याचे पालिकेने म्हटले आहे. मुंबई आरोग्य सेवा उपसंचालक, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे वैद्यकिय आरोग्य अधिकारी, १ ते २० नागरी आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी आणि इंडियन मेडीकल असोसिएशनचे पदाधिकारी याची एक बैठक पार पडली होती.
या बैठकीत वैद्यकिय अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील वैद्यकिय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांची यादी पालिका कार्यालयास जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही यादी जमा केली असून यानुसार ४५२ डॉक्टरांचा समावेश आहे. पालिका आरोग्य विभागाने बुधवारी डॉक्टर्स दिनानिमित्ताने राबविलेल्या विशेष मोहिमेत ४५२ पैकी ३३ वैद्यकिय व्यवसाय करणाऱ्यांच्या वैद्यकिय शिक्षण प्रमाणपत्राबाबत संशय असून त्यांच्या प्रमाणपत्राची तपासणी करण्यात येत आहे.
यातील एकावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. वैद्यकिय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर अधिक तिव्रतेने कार्यवाही सुरु राहणार असून भिवंडी शहरातील वैद्यकिय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांनी महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे, अशी माहिती पालिकेचे माहिती व जनसंपर्क अधिकारी श्रीकांत परदेशी यांनी दिली.
