FDA raid on illegal cosmetics factory in Bhiwandi: अन्न व औषध प्रशासनाने आता सौंदर्यप्रसाधनांच्या वस्तूंवर कारवाईला सुरुवात केली आहे. उत्पादन परवाना नसतानाही सौंदर्यप्रसाधनाच्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या भिवंडी येथील एका कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून १ कोटी २३ लाख १३ हजार ३९३ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे, यामध्ये लहान मुलांना वापरली जाणारे साबण, शॅम्पूचा देखील सामावेश आहे.
भिवंडी येथील माणकोली-दापोडे भागात विना परवाना सौंदर्यप्रसाधनांचे उत्पन्न सुरु असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, सोमवारी प्रशासनाने दापोडे येथील हरीहर काॅम्प्लेक्समध्ये ‘सिग्मा लाईफस्टाईल प्रा.लि.’ या कारखान्यावर छापा टाकला. या कंपनीकडे कोणतेही वैध परवाना नव्हता. कारखान्यात नामफलक देखील नव्हते. ऑनलाईन बाजारपेठेत ग्राहकांची दिशाभूल करण्यासाठी उत्पादनांवर ‘सल्फेटमुक्त आणि पॅराबेनमुक्त’ असा मजकूर आणि अंधेरी येथील बनावट पत्ता छापण्यात आला होता. वस्तूच्या खोक्यावर बॅच क्रमांक आणि कायदेशीर माहिती नव्हती. कारखान्यात कोणत्याही प्रकारची गुणवत्ता चाचणी प्रयोगशाळा किंवा चाचणी अभिलेखा आढळला नाही.
या कारवाईत क्रीम फिलिंग यंत्र, श्रींक रॅपिंग यंत्र, लेबलिंग यंत्र, ऑटोमॅटिक पावडर फिलिंग यंत्र, एअर काॅम्प्रेसर, वजन काटे, जनरेटर, उत्पादनासाठीचा कच्चा आणि पक्का माल असा एकूण १ कोटी २३ लाख १३ हजार ३९३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संबंधित कारखान्यातील जबाबदार व्यक्तींविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जप्त करण्यात आलेले उत्पादन
जप्त करण्यात आलेल्या सौंदर्यप्रसाधनामध्ये मुलांच्या वैयक्तिक निगा राखण्यासाठी तसेच पुरुषांसाठी असलेल्या विविध उत्पादनांचा सामावेश होता. त्यामध्ये हेअर केअर किट, बाॅडी केअर हॅम्पर, शॅम्पू, हेअर सिरम, बेबी लोशन, पावडर, सनस्क्रिन, हेअर ऑईल, कंडिश्नर, क्रीम, साबन, बेबी वाॅश, रिपलेंट, मसाज ऑईल, बाॅडी वाॅश, डॅन्ड्रफ कंट्रोल शॅम्पू, हेअर जेल, फेस वाॅश, एसपीएफ ५० प्लस हेअर स्प्रे आणि परफ्यूम यांसह विविध सौंदर्यप्रसाधनांचा सामावेश आहे.
