ठाणे : कपड्यांच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सहा जणांची ४६ तोळे सोन्याचे दागिने आणि २४ लाख २५ हजार ८०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार भिवंडीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात मे. ए.ए. कलेक्शनशी संबंधित रफाना अन्सारी, तिचा पती तन्वीर अन्सारी, वहिनी शबनम अन्सारी आणि भाचा दराब अन्सारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रफाना अन्सारी, तिचा पती तन्वीर अन्सारी, तिची वहिनी शबनम अन्सारी आणि भाचा दराब अन्सारी या चौघांविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे.
भिवंडीतील गैबीनगर परिसरात मे. ए.ए. कलेक्शन या नावाने रफाना अन्सारी ही घरातून कपडे विक्रीचा व्यवसाय करत होती. २०२० मध्ये तक्रारदार महिला रफाना हिच्याकडून कपडे खरेदी करत असे. रफाना हिने आपला कपड्यांचा व्यवसाय ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमातून मोठ्या स्तरावर सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी पुरेशी रक्कम नसल्याचे सांगून तिने तक्रारदार महिलेला पैसे गुंतविण्याची विनंती केली. त्याबदल्यात नफ्यातील वाटा देण्याचे आश्वासनही तिने दिले.
२०२१ मध्ये रफाना हिने तक्रारदार महिला आणि तिच्या दोन मैत्रिणींना नवीन कपडे दाखविण्यासाठी घरी बोलावले. त्यावेळी रफानाचा भाचा दराब आणि वहिनी शबनम हेही तेथे उपस्थित होते. तिघांनी मिळून कपड्यांच्या व्यवसायातून चांगला नफा मिळत असल्याचे सांगितले. त्यावेळी रफानाचा पती तन्वीर सौदी अरेबियात होता. त्यानेही व्हिडीओ कॉलद्वारे तक्रारदार महिलेशी संवाद साधत गुंतवणुकीबाबत विश्वास ठेवण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदार महिलेने रफानाच्या व्यवसायात ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, काही दिवसांनी व्यवसायासाठी आणखी पैशांची गरज असल्याचे, कपड्यांचा माल अडकल्याचे अशी विविध कारणे सांगून रफाना हिने तक्रारदार महिलेकडून पैसे घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी तिच्याकडील सोन्याचे दागिने गहाण ठेवण्यासही भाग पाडल्याचा आरोप आहे.
मात्र, पैसे आणि सोन्याचे दागिने घेतल्यानंतर रफाना हिने तक्रारदार महिलेला कोणताही परतावा दिला नाही. २०२४ मध्ये रफाना सौदी अरेबियाला निघून गेली. त्यानंतर सुमारे वर्षभराने ती भिवंडीत परत आली. यावेळी तक्रारदार महिलेने तिला एका नगरसेवकाच्या कार्यालयात नेले. तेथे रफाना हिने काही रक्कम परत केली. काही दिवसांनी उर्वरित रकमेची मागणी केल्यानंतर रफाना हिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे तक्रारदार महिला तिच्या घरी गेली असता, रफाना हिने अशाच प्रकारे आणखी पाच जणांची फसवणूक केल्याचे समोर आले. यानंतर तक्रारदार महिलेने शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. या तक्रारीच्या आधारे रफाना अन्सारी, तन्वीर अन्सारी, शबनम अन्सारी आणि दराब अन्सारी यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
