ठाणे – पश्चिम आशियातील देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठ्याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असताना काही ठिकाणी काळाबाजार वाढल्याचे प्रकार समोर येत आहेत. अशाच प्रकारावर कारवाई करत ठाणे शिधावाटप विभागाच्या ‘फ’ परिमंडळातील भरारी पथकाने भिवंडीतील वालपाडा येथील वर्धमान टॉवर परिसरात शनिवारी अचानक छापा टाकून अनधिकृतरीत्या साठवून ठेवलेले ८४ गॅस सिलिंडर जप्त केले. या कारवाईत तीन टेम्पो जप्त करण्यात आले असून चालकासह दोन जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
देशांमध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण लष्करी संघर्षामुळे जगभरात इंधन पुरवठ्याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. या युद्धाचा आजचा पंधरावा दिवस आहे. या युद्धामुळे काही ठिकाणी नागरिकांमध्ये गॅसबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. समाजमाध्यामांवर गॅस सिलिंडरची कमतरता भासणार असल्याच्या संदेशांचेही मोठ्या प्रमाणावर प्रसारण होत आहे. देशात गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असताना काही ठिकाणी काळाबाजार वाढल्याचे प्रकार समोर येत आहेत. अशाच प्रकाराला आळा घालण्यासाठी ठाणे शिधावाटप विभागाच्या फ परिमंडळातील उपनियंत्रक शिधावाटप प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिधावाटप निरीक्षक भगवान खंडेराव, गणेश हरणे, मनीष शास्त्री यांनी कारवाई केली.
वर्धमान टॉवर परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरची मोठ्या प्रमाणात साठवणूक करून ते चढ्या दराने विक्री केली जात असल्याची माहिती शिधावाटप विभागाला मिळाली होती. त्यानुसार शनिवारी भरारी पथकाने धाड टाकून तीन टेम्पोमध्ये ठेवलेले ८४ गॅस सिलिंडर जप्त केले. या कारवाईत भारत गॅस, एचपी गॅस, गो गॅस या कंपन्यांचे सिलिंडर आढळून आले.
या सिलिंडरमध्ये घरगुती वापरासाठीचे १४ किलोचे तसेच व्यावसायिक वापरासाठीचे १७, १९ आणि २१ किलोचे सिलिंडर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गॅसचा तुटवडा असताना हे सिलिंडर बाजारात ४ ते ५ हजार रुपयांपर्यंत चढ्या दराने विकले जात असल्याची माहितीही समोर आली आहे. या प्रकरणात टेम्पो चालकासह दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून संबंधित मालक फरार असल्याचे सांगण्यात आले. त्याच्यावर आणि संबंधितांवर जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, अशा प्रकारच्या अनधिकृत साठवणुकीबाबत भरारी पथकाकडून पुढील तपास सुरू असून इतर ठिकाणीही अशी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
