ठाणे: भिवंडीतील मिठपाडा आणि पारोळ रोड परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गॅस सिलिंडर साठवणुकीवर अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने मोठी कारवाई करत काळ्याबाजाराचा पर्दाफाश केला आहे. या धाडीत तब्बल ७५० व्यावसायिक सिलिंडर जप्त करण्यात आले असून, त्यांची किंमत सुमारे १२ लाख ८० हजार रुपये इतकी आहे. दाट लोकवस्तीत सुरू असलेल्या या धोकादायक साठवणुकीमुळे मोठी दुर्घटना टळल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
राज्यात पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनाच्या (ATF) अवैध साठवणुकीवर कडक कारवाई सुरू असतानाच आता अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने गॅस सिलेंडरच्या काळ्याबाजारा विरोधातही मोहीम तीव्र केली आहे. याच पार्श्वभूमीवर भिवंडीत मिठपाडा आणि पारोळ रोड परिसरात मोठी कारवाई करत तब्बल ७५० व्यावसायिक गॅस सिलिंडरचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे.
अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या दक्षता पथकाला मिठपाडा परिसरातील दोन गाळ्यांमध्ये बेकायदेशीर गॅस सिलेंडर साठवणूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने अचानक छापा टाकून मोठ्या प्रमाणावर साठा उघडकीस आणला. कारवाईदरम्यान ५ किलो वजनाचे ६५३ भरलेले सिलिंडर, ९२ रिकामे सिलिंडर आणि १९ किलो वजनाचे ६ रिकामे सिलिंडर असा एकूण ७५० सिलिंडरचा साठा जप्त करण्यात आला. सुमारे १२ लाख ८० हजार रुपये किंमतीचा हा मुद्देमाल अत्यंत धोकादायक पद्धतीने दाट लोकवस्तीत ठेवण्यात आला होता. या प्रकरणी संबंधित गाळा मालक आणि इतर आरोपींविरोधात जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या रॅकेटचे धागेदोरे शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. ही संपूर्ण कारवाई उपनियंत्रक शिधावाटप गणेश बेल्लाळे, पुरवठा निरीक्षण अधिकारी गौतम राऊत, शिधावाटप निरीक्षक रविंद्र राठोड, राजीव भेले, विकास नागदिवे, राहुल इंगळे, अरुण काते, देवानंद थोरवे, राजेश सोरते आणि पवन कुंभले यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
…तर भिवंडीत मोठी दुर्घटना घडली असती!
अत्यंत दाट लोकवस्ती असलेल्या मिठपाडा परिसरात हा अवैध साठा सुरू होता. सुरक्षा नियमांकडे पूर्ण दुर्लक्ष करून सुरू असलेल्या या अवैध साठवणुकीमुळे किरकोळ ठिणगी किंवा गॅस गळती झाल्यास मोठा स्फोट होण्याची शक्यता होती. प्रशासनाच्या तत्पर कारवाईमुळे संभाव्य जीवितहानी टळली असून स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
पेट्रोल-डिझेलनंतर आता गॅस माफियांवर नजर
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पेट्रोल, डिझेल आणि ATFच्या अवैध साठ्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. त्यानंतर आता अन्न व नागरी पुरवठा विभागाने गॅस सिलेंडरच्या काळ्याबाजारावरही कठोर भूमिका घेतली असून अशा प्रकरणांवर विशेष मोहीम राबवली जात आहे.
