ठाणे : भिवंडीतील कोहीनूर इमारत दुर्घटनेची गंभीर दखल घेत महापालिकेचे प्रभारी आयुक्त श्रीकृष्ण पांचाळ यांनी सी-१, सी-२अ आणि सी-२ब प्रवर्गातील सर्व इमारतींचे फेरसंरचनात्मक परीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. चुकीचे वर्गीकरण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा देत शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची तातडीने आणि दर्जेदार दुरुस्ती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर हे रजेवर आहेत. यामुळे आयुक्त पदाचा प्रभारी पदभार ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. गंगाराम वाडी येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आयुक्त श्रीकृष्ण पांचाळ यांनी महानगरपालिकेतील सर्व नियंत्रण अधिकारी आणि विभागप्रमुखांची बैठक घेऊन आपत्कालीन परिस्थीती आणि रस्त्याच्या दुरावस्थेचा आढावा घेतला. या बैठकीस अतिरीक्त आयुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सपना वसावा, उपायुक्त बाळकृष्ण क्षिरसागर, शहर अभियंता जमील पटेल, सहायक संचालक नगररचना अजय साबळे तसेच महानगरपालिकेचे सर्व अभियंते व विभाग प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीत प्रामुख्याने धोकादायक आणि अतिधोकादाय इमारतींच्या वर्गवारीचा आढावा घेण्यात आला. दुर्घटनाग्रस्त कोहीनूर इमारत ही सी-२अ म्हणजेच, दुरुस्तीयोग्य धोकादायक इमारत प्रवर्ग मध्ये नोंदविण्यात आली होती, त्याबाबत आयुक्त पांचाळ यांनी नाराजी व्यक्त केली.
सी-१ म्हणजेच अतिधोकादायक इमारतींचा प्रवर्ग, सी-२अ म्हणजेच दुरुस्तीयोग्य धोकादायक इमारतींचा प्रवर्ग आणि सी-२ब म्हणजेच संरचनात्मक दुरुस्ती आवश्यक असलेल्या धोकादायक इमारतींचा प्रवर्ग या सर्व प्रवर्गातील सर्व इमारतींची फेर तपासणी करुन त्यांचे संरचनात्मक लेखापरिक्षण करावे आणि पुन:श्च सर्व इमारतींची वर्गवारी निश्चित करुन त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश पांचाळ यांनी अतिक्रमण निष्कासन विभागाचे उपायुक्त आणि सहायक संचालक नगररचना यांना दिले. तसेच जे अधिकारी जाणीवपुर्वक इमरतींचे वर्गीकरण चुकीचे सादर करीत असतील, त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
शहरातील रस्त्यांवरील खड्डे आणि त्यांच्या दुरूस्तीचा आढावाही त्यांनी घेतला. निधीची तरतूद नसेल तर काम थांबविण्यापेक्षा निधी तरतूदीच्या अधीन राहून काम करावे. तसेच, काम करताना केवळ कंत्राटदार अथवा यंत्रणेवर अवलंबून न राहता, अभियंत्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून पर्यवेक्षण करावे. दुरूस्तीच्या कामाकरिता पावसाची उसंत मिळाल्यास मुनष्यबळ वाढवून काम लवकरात लवकर पुर्ण करावे. मात्र हे करताना गुणवत्तेमध्ये तडजोड होता कामा नये. ज्या रस्त्यावर वाहतुक अथवा वर्दळ जास्त असते अशा ठिकाणी वाहतूक विभागाशी समन्वय साधून वाहतूक आवश्यकता भासल्यास वाहतुकीचे नियोजन करुन, काम पुर्ण करावे. शाळांच्या बस, रिक्षा, दुचाकी यांना सुयोग्य होईल अशी रस्ते दुरूस्ती करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
