ठाणे : भिवंडी येथील नारपोली भागात तळ अधिक चार मजली आरसीसी इमारत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेपूर्वी भिवंडी-निजामपूर महापालिकेने या इमारतीबाबत मागील सहा वर्षांत तीन वेळा नोटीस बजावल्याची माहिती उघड होत आहे.
इमारत धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संरचनात्मक तपासणी (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यापासून ते इमारत रिकामी करण्यापर्यंतच्या सूचना देण्यात आल्या होत्या. याशिवाय पाणी व वीजपुरवठाही खंडित करून रहिवाशांचे स्थलांतर करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही महापालिकेची परवानगी न घेता बेकायदा दुरुस्ती सुरू ठेवण्यात आल्याने हा दुर्घटनेचा प्रकार घडल्याची माहिती महापालिकेने दिली.
नारपोली येथील कोहिनुर इमारत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित इमारतीला ७ सप्टेंबर २०२० रोजी प्रथम लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याची नोटीस देण्यात आली होती. त्यानंतरही अहवाल न सादर केल्याने २२ एप्रिल २०२२ रोजी स्मरणपत्र नोटीस बजावण्यात आली. तरीही कोणतीही कार्यवाही न झाल्याने ५ जून २०२६ रोजी इमारत निर्मनुष्य करण्याची नोटीस देण्यात आली. त्यानंतर महापालिकेने इमारतीचा पाणी व वीजपुरवठा खंडित करून रहिवाशांचे स्थलांतर केले होते.
दरम्यान, ३० जुलै २०२६ रोजी संबंधित इमारतीत महापालिकेची परवानगी न घेता बेकायदा दुरुस्ती सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक आयुक्तांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी इमारतीची संरचना अस्थिर झाल्याचे दिसून आले. महापालिकेच्या पथकाने दुरुस्ती करणारे मजूर तसेच ११ कुटुंबांतील सुमारे ३५ ते ४० रहिवाशांना तातडीने बाहेर काढण्यास सुरुवात केली.
कंत्राटदार व मजुरांना काम तात्काळ बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, काही रहिवाशांनी बाहेर पडण्यास नकार दिला. त्याचवेळी इमारतीचा मागील भाग कोसळण्यास सुरुवात झाली. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर भिवंडी येथील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, महापालिका आयुक्तांनी विनापरवानगी दुरुस्तीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
